स्मृती किंवा आठवणी या कधीही विसरल्या जात नाही.किंवा नष्ट होत नाही त्या वर्तमान काळातच परावर्तित होतात म्हणतात की, 'विस्मरण' ही एक देणगी मानवाला आहे; पण तरीही कितीतरी आठवणी या आपल्याला जशाच्या तशा आठवतात आणि त्या इतरांना सांगाव्याशा सुद्धा वाटतात.दुःख विसरायचं असतं आणि हसत हसत जगण्याला सामोरे जायचं असतं.अडचणी तर येतच असतात म्हणून तर जगणं समृद्ध होत जाते.आपल्या बरोबर माणसे जोडत जाऊन ते अधिकाधिक समृद्ध करण्यातच जीवनाचं सार्थक असतं.अशाच बालपणीपासूनच्या आठवणींचा एक प्रवास वाचनात आला. निमित्त होतं शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी लिहिलेलं 'आठवणींचा डोह' हे पुस्तक.
एक धडपडीचा कार्यकर्ता,एका निष्ठेने,ध्येयाने,विचाराने प्रेरित होऊन कसा घडत गेला,त्यांचे जीवनच एक चळवळ बनत गेली म्हणूनच हे पुस्तक परिवर्तनवादी विचारांच्या कृतिशील कार्यकर्त्यांना लेखकाने समर्पित केले आहे.प्रसिद्ध लेखक समीक्षक डॉ.मिलिंद कसबे यांनी प्रस्तावनेत 'प्रकाशमान आठवणींचा सांस्कृतिक डोह' असे पुस्तका संबंधी यथार्थ लिहिले आहे.कारण या आठवणींचा प्रवास बालपणापासून ते आत्तापर्यंतच्या जडणघडणीतील सामाजिक, सांस्कृतिक, वाङमयीन, प्रबोधनात्मक क्रांती कार्याचा, आत्मपर आठवणींचा आढावा स्वतःसाठी आणि वाचकांसाठी एक दस्तऐवज म्हणता येईल.
लेखक सुनील गोसावी यांचा जन्म कोरडगावचा आणि वेगवेगळ्या गावी झालेले शिक्षण, पुढील कार्यासाठी अहिल्यानगर मध्ये ते स्थायिक झाले.तेथील आठवणी यात आहेत. पुस्तकातील आठवणींचा काळ १९७५ पासून ते २०२० पर्यंतचा काळ आहे. लेखकांनी मनोगतातच सांगितले की,या आठवणी कोरोना काळात जाग्या झाल्या, हा काळ लॉकडाऊनचा होता.आजूबाजूला एक शांतता होती, या काळात जुने दिवस आठवून नव्याने जगत असल्याचा अनुभव लेखकांनी घेतला आणि ही लेखमाला प्रसिद्ध झाली.
आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर भेटत गेलेल्या,जोडत गेलेल्या आणि दुरावलेल्या सुद्धा माणसांच्या आठवणी प्रामाणिकपणे जशाच्या तशा लिहिण्याचा प्रयत्न लेखकांनी समर्थपणे केला आहे.कोरडगावी गेलेले बालपण, नातेसंबंधांची सुखद वीण, नांदेवलीचं निखळ प्रेम मिळाल्याच्या आठवणी, तेथील गाव गाड्याचं वर्णन वाचकांच्या नजरेसमोर ग्रामीण चित्रच उभं करतं.लेखकांची खंत शहरातील नोकरदारांना गावाकडचं प्रेम कसं मिळणार ? ही मनाला लावून जाते.
मामाच्या गावच्या आठवणीने लेखक भरभरून मनसोक्त विहिरीमध्ये डुंबत आनंद घेत जगल्याचे दिसते.बालपणीच्या आठवणीत बैल बैल खेळणे,बिरोबाची व्हाइक ऐकणे,गावाकडील सर्वधर्म समभावाने सर्वांचे सण, उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करणे, गणपती उत्सवात हिरीरीने भाग घेणे.हे अगदी त्या बालपणीच्या मित्रांच्या नावासह लेखक रंगवून सांगताना गावपण आणि माणूसपण हरवत चालल्याची खंत व्यक्त करतात. गावाकडचं मनमुराद जगणं, भाकरी,भाजी चटणी,कांदा, दूध आणि नानांच्या आठवणी वाचण्यात मन गुंगून जाते. कावडीची मजा लेखकांनी घेतलेली. त्यात 'थोडसं दुःख वाटून घ्यायचा प्रयत्न होई' या वाक्याने प्रत्येकाने प्रत्येकाचे थोडे दुःख वाटून घेतले तर सोपे वाटून जाते.
वडील शिक्षक असल्याने शिक्षण झाले त्या-त्या शाळेच्या आठवणी सांगून 'मित्र मंडळ हिच आयुष्याची खरी कमाई आणि जगण्याची उमेद' लेखकांना भरभरून देऊन गेल्याचे जाणवते. गावाकडची माणुसकी, आई व बाईच्या हातून मिळालेल्या रानमेव्याच्या आठवणीत वाचकांना खिळवून ठेवण्याची जादू लेखकांना साधलेली दिसते.नकळत चिंचा, कैऱ्या,बोरांच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटते आणि गावातलं प्रेम आता शहरात दिसत नाही, असे लेखका प्रमाणे आपल्यालाही वाटून जाते. आजीच्या आठवणीने गहिवरून येते, ते मला लेखकांची भावुक्ता मानाला भावते.वडिलांची बदली झाली तेव्हा अख्खा गाव सोडायला येतो,यावरून त्या काळात गुरू बद्दलची गावची आस्था लक्षात येते.
आजची परिस्थितील फरक ही जाणवतो.गावात शांततेत, सलोख्यात मदत करत लोक एक जीवाने राहायचे, याची अनेक उदाहरणे गावपणाची ओढ लावून जातात. बालपणातील चुकाही लेखकांनी प्रामाणिकपणे कबूल करत गोट्यांची चोरी सांगितली आहे. खेळण्यातील विविधता, धडपडीतून झालेल्या जखमा देखील मनपटलावर कोरल्या गेल्या.गावाकडच्या यात्रेत नातेवाईक भेटल्यावर सुख दुःखाच्या गोष्टी होत आणि आता क्षणाक्षणाला मोबाईलमुळे जोडले गेलो तरी एकमेकांच्या सुखदुःखाची जाणीव होत नाही. चित्र स्क्रोल केल्याप्रमाणे माणूस पुढे जातो आणि कितीतरी गोष्टी डिलीट करत जातो असे जाणवते.
नगरला लेखक इयत्ता सहावीत असताना दाखल झाले, त्यानंतर नगरच्या मातीत रुजण्याच्या आठवणींमध्ये तत्कालीन नगर मधील सामाजिक, सांस्कृतिक खाणाखुणा अचूक टिपल्या आहेत. नवख्या शहरात जोडत गेलेली माणसे,शिक्षकांच्या आठवणी यात लेखक रमत जातात. आयुष्याच्या वळणावर जीवनातील सर्व खेळ खेळण्याचे सामर्थ्य दिल्याची कृतार्थ कृतज्ञतेची जाणीव करून देते. पुढे कॉलेज जीवनात आलेली नेतृत्वाची जबाबदारी,शिबिरांच्या माध्यमातून मिळालेले प्रशिक्षण, मोठमोठे आदर्श व्यक्तींचा सहवास,मार्गदर्शन सभा धीटपणाची शिकवण,वाचनाने माणूस समृद्ध बनतो सामाजिक भान येऊन वैचारिक भूमिका तयार होते,हा जपलेला मुलमंत्र, वृत्तपत्र वाचनाची आवड,पत्र कथा कविता लेखनाची सुरुवात आणि प्रसिद्ध कॉम्रेड कार्यकर्ता म्हणून निर्माण झालेली ओळख, निवडणूक काळातील अनुभव, साहित्याशी जोडत जाऊन एकीकडे वाटचाल करत साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची भूक यातून एक धडपडे व्यक्तिमत्व घडत गेल. त्यात कम्युनिस्टचा साधेपणा, सच्चेपणा भावला गेला.पुढे एमएसडब्ल्यू च्या शिक्षणाचा टप्पा पूर्ण करत समाजकार्याच्या अनुभवातून अभ्यास होत गेला.
संकट काळात झालेल्या मदतीची आठवण लेखक आवर्जून करतात.आता शब्दगंध साहित्यिक परिषदेचे कार्य सर्वदूर पसरले आहे, परंतु त्याची सुरुवात नवोदित कवींना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कशी झाली,या चळवळीचा इतिहास अनोखा शब्दगंध मधून मांडला गेला आहे. काव्य स्पर्धा, प्रातिनिधीक काव्यसंग्रह,दिवाळी अंक, मासिक अंक या बरोबरच विविध ठिकाणी होणाऱ्या काव्य संमेलनासाठी उपस्थिती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील आठवणी यातून आवड असेल तर सवड मिळतेच या वक्तीतून साहित्य कार्य लेखकांनी आस्थादायक चालू ठेवल्याचे दिसत आणि चालूच राहणार साहित्याचा सुगंध सर्व दूर पसरवण्यासाठी शब्दगंध प्रकाशनची
वाटचाल,शब्दगंधच्या पहिल्या साहित्य संमेलनापासून ते तेरावे संमेलन पर्यंतचा आठवणींचा प्रवास,कवयित्री शर्मिलांची साथ आणि कार्यासाठी मिळालेली निश्चित दिशा,यांच्यासह फुलोरा फुलत जाऊन शब्दगंधच्या विविध तालुक्यात पसरलेल्या शाखाशी जोडली गेलेली हजारो माणसे या माणसांच्या मनात निर्माण केलेले एक माणूस म्हणून जपत आलेल्या,पुढील साहित्य ,सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवासाच्या आठवणींचा डोह नव्हे तर सागर होण्यासाठी मनापासून शुभेच्छा.!
सुरेखा घोलप
अहिल्यानगर
