नाशिक दिनकर गायकवाड यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि पुणे येथील यशस्वी ॲकॅडमी फॉर स्किल्स यांच्यातअमेरिकेत मुख्यालय असणाऱ्या संगणक व तंत्रज्ञान क्षेत्रातील आयबीएम कंपनीचा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे मुक्त विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच रोजगाराभिमुख संगणकीय कौशल्य आधारित अद्ययावत शिक्षण मिळणार आहे.
यासंबंधी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील व्यवस्थापन मंडळ सभागृहात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.संजीव सोनवणे व आयबीएम कंपनीचे भारतातील आयबीएम इनोव्हेशन सेंटर फॉर एज्युकेशनचे सल्लागार व प्रमुख संजीव मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक झाली.
त्यात विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव दिलीप भरड,अंतर्गत गुणवत्ता व आश्वासन केंद्राचे (सिका) संचालक डॉ. मधुकर शेवाळे, तसेच आयबीएम कंपनीच्या वतीने अभ्यासक्रम संयोजक म्हणून पुणे येथील यशस्वी ॲकॅडमी फॉर स्किल्सचे संचालक विश्वेश कुलकर्णी व मुख्य प्रशिक्षण अधिकारी राजेश नागरे यांनी या शैक्षणिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
यावेळी विद्यापीठ प्र-कुलगुरू प्रा. डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन,व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. संजीवनी महाले, स्कूल ऑफ डिजिटल एज्युकेशनच्या संचालिका एमिरेटस प्रा.कविता साळुंके,विद्यापीठाच्या मानध्य व सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे संचालक नागार्जुन वाडेकर, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे संचालक डॉ. सुरेंद्र पाटोळे, महाज्ञानदीपचे प्रा. गणेश लोखंडे आदी उपस्थित होते.या करारानुसार विद्यार्थ्यांना एक वर्ष कालावधीचा एकूण तीन वर्षांचा ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
त्यात प्रथम वर्षासाठी मुलभूत संगणकीय रोजगाराभिमुख कौशल्ये,द्वितीय वर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए.आय.)वापर व तृतीय वर्षात संगणक ए.आय. आधारित प्रकल्प असे या अभ्यासक्रमाचे स्वरूप असणार आहे. वर्षभरात दोन सत्रांत प्रत्येकी दोन श्रेयांक त्यासाठी असतील.
