नाशिक (दिनकर गायकवाड) शहरातील म्हसरूळ
परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये हजारोंचा ऐवज अज्ञात चोरटधाने चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडीचा पहिला प्रकार मानेनगर येथे घडला.फिर्यादी विकास सतीश सोनवणे (रा. रामगहिया जवळ, मानेनगर, म्हसरूळ) यांच्या आशापुरा सोसायटीतील घराचा दरवाजा व कडीकोयंडा अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला.
घरातील बेडरूममध्ये असलेले कपाट उघडून त्यातील ३१ हजार ९०० रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व ७ हजार रुपयांची रोकड असा ३८ हजार ९०० रुपयांचा ऐवज घरफोडी करून दि. ५ ते ९ मेदरम्यान चोरून नेला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस
ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
घरफोडीचा दुसरा प्रकार पेठ रोड येथे घडला. फिर्यादी सुनीता नामदेव भोये (रा. एस. टी. वर्कशॉपसमोर, पेठ रोड) या राजमान्य सोसायटीत राहतात. दि. २५ एप्रिल ते १० मे या कालावधीत त्या कुटुंबीयांसह मूळ गावी होत्या.
त्यादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून घरातील ३४ हजार रूपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स व ५०० रुपये किमतीचा चांदीचा कॉईन असा ३४ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.
