श्रीरामपूर दिपक कदम तालुक्यातील मातापुर येथील प्रगतिशील व नाविन्यपूर्ण शेती करणारे दिपक उंडे हे दिनांक २२ मे ते ४ जून २०२५ या कालावधीत लेह-लडाख अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत.त्यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय शिष्टमंडळ हा दौरा करणार असून हवामानाचा अभ्यास,तसेच कुक्कुटपालन व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या हवामानविषयक घटकांचा अभ्यास हा दौऱ्याचा प्रमुख हेतू आहे.अत्यंत थंड हवामान आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत शेती कशी केली जाते,याचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
लेह-लडाखमधील पारंपरिक व आधुनिक शेती पद्धती,पाण्याचे नियोजन,ग्लोबल वॉर्मिंगचा शेतीवर होणारा परिणाम तसेच स्थानिक पिके आणि कृषी पर्यटन यांचा सखोल अभ्यास करण्याचा उंडे पा.यांचा मानस आहे.यासोबतच स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून अनुभव जन्य ज्ञान घेण्यावरही भर दिला जाणार आहे.
या अभ्यास दौऱ्यातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग मातापुरसह परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,अशी अपेक्षा यावेळी व्यक्त होत आहे. शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग,हवामान बदलाचा सामना करणाऱ्या तंत्रज्ञानांचा अभ्यास करून,हे ज्ञान स्थानिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उंडे पाटील यांचा उद्देश आहे.दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बेलापूर रेल्वे स्टेशन येथे त्यांच्या शुभचिंतकांनी उंडे पा.आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा दिल्या.त्यांच्या या अभ्यास दौऱ्यामुळे मातापुरातील शेतीला नवसंजीवनी मिळेल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.यावेळी राजेंद्र वर्पे,भरत गायधने, संगम जगदाळे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
