श्रीरामपूरदिपक कदम- महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व जलसंपदा मंत्री,तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता करातील शास्ती माफीसाठी सुरु केलेल्या अभय योजनेचा लाभ श्रीरामपूर शहरातील मालमत्ताधारक नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, भाजपचे माजी नगरसेवक रवी पाटील, भाजपचे माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांनी केले आहे
याबाबत सविस्तर माहिती देताना केतन खोरे यांनी सांगितले की, राज्य सरकारने शास्तीकर माफीचा निर्णय घेण्यासाठी अभय योजना लागू केली आहे.नगरपरिषद हद्दीत राहणाऱ्या नागरिकांची मालमत्ता करावरील शास्ती ५०% पर्यंत कमी करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांचेकडे असणार आहे.याबाबत जिल्हाधिकारी यांनी अंतिम निर्णय ३० दिवसाच्या आत घेणे बंधनकारक असल्याचे नमूद आहे. तर ५०% पेक्षा अधिक शास्ती कर माफी हवी असल्यास जिल्हाधिकारी यांनी सदर प्रस्ताव आपल्या अभिप्रायासह आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचलनालय यांचेकडे पाठवायचे आहेत.त्यानंतर आयुक्तांनी हे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवायचे असून ५०% हून अधिक शास्ती कर कमी करण्याचा अंतिम निर्णय राज्य शासन घेणार असल्याचे नमूद असल्याचे केतन खोरे, रवी पाटील व दीपक चव्हाण यांनी सांगितले.
श्रीरामपूर शहरातील मालमत्ता धारक नागरिकांनी आपले शास्तीकर माफीचे प्रस्ताव लवकरात लवकर नगरपरिषद, श्रीरामपूर यांचेकडे दाखल करावेत व अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे बाळासाहेब हरदास, भैय्या भिसे, राहुल पांढरे, विजय पाटील, किरण उइके, विशाल रुपनर, कार्तिक मंडवे, सिध्दांत पाटील, विशाल पाटील, नवनाथ पवार, चंदन जुनी,सागर म्हस्के आदींनी केले आहे.
