मानधन प्रस्ताव तातडीने मंजूर करा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कळब सिटीलाईन न्यूज नेटवर्क वृद्ध कलावंतांचे सन २०२२ ते २०२५ पर्यंत मानधन प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या नेतृत्वात वृद्ध कलावंतांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली.यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्ह्यातील गोरगरीब कलावंत ज्यांची आपल्या कलेच्या सादरीकरणावरच कुटुंबाची गुजराण आहे.
हजारो कलावंतांनी आपले मानधन प्रस्ताव अर्ज ऑफलाइन व ऑनलाइन संबंधित पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषद पंचायत विभागाकडे सादर केलेले आहेत. मात्र चार वर्षांचा कालावधी लोटूनही त्यांचे प्रस्ताव अर्ज प्रलंबित पडून आहेत. परिणामी कलावंत या योजनेच्या लाभासाठी पात्र असूनही निवड प्रक्रिया राबविल्या न गेल्याने ते लाभापासून वंचित आहेत.शासनाने जाहीर केलेल्या योजनेचा आपणास लाभ होईल. कुटुंबाला जगण्यासाठी हातभार लागेल, ही आस धरून संबंधित कार्यालयात विचारणा करण्यासाठी खेटे घालत आहेत.
मात्र, त्यांच्या पदरी निराशा व उपेक्षाच पडत आहे. कलावंतांवर होत असलेल्या अन्यायाची गंभीरतेने दखल घ्यावी व तातडीने निवड प्रक्रिया राबवावी,अशी मागणी यावेळी कलावंतांनी केली आहे. यावेळी राष्ट्रीय महासचिव ॲड.श्याम खंडारे, विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ भवरे, जिल्हाध्यक्ष अविनाश बनसोड, हभप दिगांबर गाडगे, गुणवंत लडके, रमेश वाघमारे, अशोक ऊम्रतकर, विनोद मडावी, गंगाधर घोटेकर, वासूदेव दाभेकर, पद्माकर कवाडे, रणजीत शेजूळे, हरिश्चंद्र बलकी, मनोहर पवार महाराज, विनायक माने, बंडू ऊटाणे, विठ्ठल काकडे, पाचभाई, कटकोजवार, मनोहर मिठे, राजू सिडाम, शंकर कूडमथे, देवस्मिता पाटील, शोभा वाठोरे, राधा सावरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.