-आंध्र प्रदेश हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
-पास्टराने घेतला होता अनुसूचित जातीचा फायदा
सिटीलाईन न्यूज नेटवर्क
अमरावती : अनुसूचित जाती (एससी) समुदायातील व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास त्याचा अनुसूचित जातीचा दर्जा तत्काळ रद्द होतो. त्यामुळे अशा व्यक्तींना अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत संरक्षण मिळणार नाही असा महत्वपूर्ण निकाल आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिला.
गुन्द्वर जिल्ह्यातील पास्टर चिंताडा आनंद यांनी दाखल केलेल्या एका तक्रारीवर आधारित प्रकरणात न्यायमूर्ती
एन. हरिनाथ यांनी हा निकाल दिला,जातीचा उल्लेख करून अवमान केल्याची तक्रार आनंद यांनी अक्कला रामिरेड्डी व इतरांविरोधात जानेवारी २०१२मध्ये चंदोलू पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यावर पोलिसांनी अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. याचिका कर्त्याचे वकील फणी दत्त यांनी युक्तिवाद केला की आनंद हे ख्रिश्चन धर्मीय असून पास्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचा एससी दर्जा संपुष्टात आला आहे.जो कोणी हिंदू धर्म वगळता इतर कोणताही धर्म स्वीकारतो,त्याचा अनुसूचित जातीचा दर्जा नाहीसा होतो अशी राज्यघटनेत तरतुद आहे.
