पठार भागाचा पाणी प्रश्न कधी मिटेल-पठारावरील जनता संभ्रमात
संगमनेर प्रतिनिधी तुम्हाला या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने घरी बसवले आहे.आता विनाकारण कोणी तालुक्याचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करणार असेल,तर आमचे कार्यकर्तेही तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाहीत.या तालुक्याला पाणी देण्याचे काम आमचे आहे,ते आम्ही करणार आहोत.वेळ पडल्यास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे पाठपुरावा करून पाच ते सहा दिवसांचे आवर्तन वाढवून घेऊ.प्रत्येक गावातील ओढे, नाले, पाझर तलाव,तसेच जिथे पाणी साठवण्याची क्षमता आहे, ते सर्व जलस्त्रोत मी स्वतः उभा राहून भरून घेणार असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. तालुक्यातील पिंपळे, तिगाव, पळसखेडे, चिंचोली गुरव, मालदाड गावातील कामांचा शुभारंभ पिंपळे येथे, तर डिग्रस, खरशिंदे, रणखांबवाडी, मांडवे बुद्रक, साकुर,वनकुटे या गावांतील विकासकामांचा शुभारंभ एकत्रितरित्या डिग्रस येथे करण्यात आला.
त्यात जलसंधारण विभागाच्या वतीने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत गाळ काढण्यात येणार आहे. त्यावेळी आ. खताळ बोलत होते. यापूर्वीच्या आवर्तनात सर्व लगतच्या गावांना पाणी मिळालेले आहे. आता आवर्तन सुरू झाल्यापासून गावा-गावांतील बंधारे
भरले जात असताना, ओढ्याला पाणी सुरू असताना स्टंटबाजी करण्याची गरज काय?, असा सवाल करून ते म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांत या तालुक्यात पाणी न जिरवता, एकमेकांची जिरविण्याची काम केले, परंतु मला एकमेकांची जिरवायची नाही, तर जमिनीत पाणी जिरवायचे आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या माध्यमातून या तालुक्यातील कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेत आहोत.
निळवंडे डावा व उजव्या कालव्यातून व्यवस्थित आवर्तन चालू आहे. हेडपासून टेलपर्यंत पाणी देण्याबाबत जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे. ज्यांनी तुम्हाला ४० वर्षे पाणी न देण्याचे पाप केले, त्यांनाच तुम्ही घरी बसवले. माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलावर तुम्ही सर्वांनी विश्वास टाकला. त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा न जाऊ देता, सर्व लहानमोठे बंधारे व पाझर तलाव भरून
देण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. ती मी पार पाडून सर्वांना पाणी कसे मिळेल, यासाठी आवर्तन वाढविण्याची वेळ आली, तरी चालेल मात्र पाण्यापासून तुम्हाला कोणालाही वंचित ठेवणार नाही. माजी मंत्र्यांना राजकारण करण्यासाठी कुठलेही मुद्दे शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे त्यांनी बगलबच्च्यांना हाताशी धरून चांगल्या कामात खोडा घालण्याचे काम सुरू केले आहे, परंतु या तालुक्यातील मायबाप जनता त्यांचे राजकारण हाणून पाडील, याची खात्री असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अभियंता कपिल बिडगर, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता हितेंद्र, जलसंधारण विभागाचे उपअभियंता सुरेश मंडलिक, उपसरपंच रंगनाथ बिडगर, शरद भालेराव, ग्रामसेविका रुपाली कहाणे, निवृत्ती बिडगर, ज्ञानदेव श्रीराम, संजय बिडवे, लक्ष्मण होडगर, यशवंत खेमनर,जमाल पठाण,फिरोज शेख आदी उपस्थित होते.
