राहाता प्नतिनिधी- तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील ग्रामस्थ व शेतकरी वीज पुरवठ्याच्या खेळखंडोब्यामुळे पूर्णतःत्रस्त झाले आहेत.युद्धजन्य काळात ब्लॅकआऊट केला जातो,मात्र गेल्या महिन्यापासून गाव अंधारात असल्याने येथील हा ब्लॅक आऊट कधी थांबणार, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
पिंपरी निर्मळ गावाला वीजपुरवठा करण्यासाठी शेती तसेच गावठाण असे दोन स्वतंत्र फिडर आहेत.यामध्ये शेतीसाठी स्वतंत्र यंत्रणा असून गावठाणसाठी अमृतेश्वर फिडर निर्माण करण्यात आलेला आहे. मुळा-प्रवरा काळातील जीर्ण झालेल्या लाईन व वाढलेला लोड मात्र त्या तुलनेत कमी असलेला वीजपुरवठा यातून मार्ग काढण्यासाठी पिंपरी निर्मळ व राजुरीसाठी स्वतंत्र सबस्टेशन मंजूर आहे.
स्वतंत्र सबस्टेशन साठी भूसंपादन देखील झालेले आहे. मात्र गेल्या पाच वर्षापासून निधीअभावी हे काम रखडले आहे. त्यातच वीज वितरण विभागाने शेती फिडरवर राजुरी,मापरवाडी सह इतर लोड वाढविला.त्यामुळे कायमच अतिरीक्त लोड व राजुरी मापरवाडी भागातील फॉल्टमुळे ही लाईन बंद असते. गेल्या महिन्यापासून गावठाण व वाडी वस्तीवरील वीजपुरवठा कायमच गायब असतो.त्यामुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाडी वस्तीवर तर बिबट्याचाही संचार होत असल्याने रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. महावितरण कंपनीने याबाबत तातडीने दखल घेऊन येथील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थ व नागरिकांमधून होत आहे.