तिकिट विक्रीचे पैसे न देता केली फसवणूक
पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क
प्रसिद्ध गायक हरिहरन यांच्या संगीत रजनीच्या आयोजनाची जबाबदारी एका संस्थेकडून ऐन वेळी दुसऱ्या संस्थेकडे सोपविल्यानंतर,आधीच्या आस्थापनाने केलेल्या तिकीट विक्रीचे पैसे आयोजकाला न देता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी राजस अतुलकुमार उपाध्ये (वय ३१) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून 'मोरया एंटरटेन्मेंट एलएलपी'चे मालक विशाल गारगोटे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या वर्षी २१ सप्टेंबर २०२४मध्ये कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन येथे हा कार्यक्रम झाला होता.
या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी मोरया एंटरटेन्मेंटवर होती.काही कारणास्तव हा कार्यक्रम त्यांनी राजस उपाध्ये यांना हस्तातंरित केला. त्या संदर्भाने त्यांच्यात करार देखील झाला होता.त्यात आधी विक्री झालेल्या तिकिटांचे पैसे उपाध्ये यांना देण्याचे नमूद होते.
ऑनलाइन तिकीट विक्रीचे मोरया एंटरटेन्मेंटच्या खात्यावर जाणारे पैसे देखील उपाध्ये यांना देण्याबाबत करारात नमूद केले होते. असे एकूण १४ लाख १७ हजार ११३ रुपये मोरया एंटरटेन्मेंटने देणे अपेक्षित होते. त्यांनी ते दिले नाहीत; तसेच उपाध्ये यांना दिलेला धनादेश देखील वटला नाही. तक्रारदारांनी त्यांच्याकडे सातत्याने पैशांची मागणी केली असता, त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. वारजे माळवाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.