बोरिवली मार्गावरील बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकराच्या भिंतीपर्यत वाढविण्याचा निर्णय

Cityline Media
0
-रहिवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी बंदिस्त कन्व्हेयर बेल्टवरून होणार राड्यारोड्याची वाहतूक

-ठाण्यातील मुल्लाबाग येथील रहिवाशांना मिळाला मोठा दिलासा.

-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीएला निर्देश.
मुंबई विशाल सावंत- ठाणे- बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे ठाण्यातील मुल्लाबाग येथील इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना होणारा त्रास दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे-बोरिवली दरम्यान बनणारा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.तसेच त्यांना होणारा धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी बंदिस्त केलेल्या कन्व्हेयर बेल्टद्वारे राडारोडा वाहून नेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
ठाणे-बोरिवली बोगद्याच्या कामाला ठाण्यातील घोडबंदर येथील पाच इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी विरोध केला होता. या कामामुळे वाढलेला धुळीचा त्रास आणि दररोज ३०० ते ५०० डंपरच्या वाहतुकीमुळे येथील रहिवाशांनी मुल्लाबाग येथील बोगद्याचे काम तत्काळ थांबवण्याची मागणी करत आंदोलन केले होते. रहिवाशांच्या या आंदोलनाची दखल घेत आज खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात नुकतीच विशेष बैठक घेतली. 

या बैठकीला ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के एमएमआरडीए आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव आणि मुल्लाबाग रहिवाशी संघाचे सदस्य आणि युवासेनेचे नितीन लांडगे हेदेखील उपस्थित होते. 

या बैठकीत प्रामुख्याने मुल्लाबाग रहिवाशी संघांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांची अडचण समजून घेण्यात आली.त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी कन्व्हेयर बेल्टवरून नेण्यात येणारा राडारोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे. या बेल्टवरून वाहून आणला जाणारा राडारोडा नंतर युनिएपेक्स कंपनीच्या आवारात डंपर आणि टिप्परमध्ये भरण्यात येईल आणि त्यानंतर तो घोडबंदर मार्गे वाहून दुसरीकडे नेण्यात येईल असे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. तसे केल्यास स्थानिकांना वाहतूक कोंडीचा तसेच धुळीचा त्रास होणार नाही. तसेच कन्व्हेयर बेल्टवरून टाकलेला राडारोडा आच्छादन टाकून बंदिस्त करण्यात येणार असल्याने तो रस्त्यावर पडून चिखल होणार नाही त्यामुळे ऐन पावसाळ्यात रस्ते चांगले राहतील आणि रहिवाशांची ती अडचण देखील दूर होईल. तसेच हे काम वेळेत होते की नाही ते पाहण्यासाठी एमएमआरडीएच्या वतीने नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्याचे निर्देशही शिंदे यांनी या बैठकीत दिले.

यासोबतच युनिएपेक्स कंपनीच्या जागेतून डीपी रोड प्रस्तावित असून भविष्यात येथे वाढणाऱ्या लोकवस्तीचा विचार करता ही जागा संपादित करून हा रस्ता देखील लवकरात लवकर करावा, तसेच या प्रकल्पासाठी ठाणे महानगरपालिकेला अधिग्रहित करायची असलेली युनिएपेक्स कंपनीची जागा देखील लवकरात लवकर अधिग्रहित करावी असेही निर्देश देण्यात आले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतल्याने मुल्लाबाग रहिवासी संघाने त्यांचे आणि खासदार नरेश म्हस्के यांचे यावेळी जाहीर आभार मानले. तसेच आजच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार काम चालते अथवा नाही ते पाहण्यासाठी आपण स्वतःमुल्लाबागला भेट देऊन परिस्थिती पहावी अशी विनंती उपमुख्यमंत्री शिंदे यांना केली. त्यानुसार एकदा याठिकाणी येऊन नक्की पाहणी करू असे सांगून शिंदे यांनी या रहिवाशांना आशवस्त केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!