पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजित ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ पक्षाच्या २६ वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला यावेळी सर्व सहकाऱ्यांना पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या व संबोधित केलं.
प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील,अतिशय थोड्या दिवसांमध्ये हा आजचा सोहळा आयोजित करण्यासाठी ज्यांनी कष्ट केले ते पक्षाचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप, त्यांचे सर्व सहकारी आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या सहकारी मित्रांनो..
आजचा हा दिवस म्हणजे पक्षाचा '२६ वा वर्धापन दिन'. २६ वर्षांपूर्वी आपण एकत्र आलो आणि 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा'ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. जनतेचा पाठिंबा मिळाला आणि बोलत बोलत पक्षाला उभारी आली. महाराष्ट्राच्या जनतेचं आपण ऋण व्यक्त करावं की, फार थोड्या दिवसांमध्ये महाराष्ट्राचा कारभार करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना सामान्य जनतेने संधी दिली. कुणी उपमुख्यमंत्री झालं, कुणी मंत्री झालं, कुणी जिल्हा परिषद, कुणी महानगरपालिका, कुणी नगरपालिका, विविध महत्त्वाची सत्तेची स्थानं सर्वसामान्य जनतेने आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठी दिली आणि लोकांची सेवा करण्याची संधी दिली.
तुमचं एक वैशिष्ट्य होतं की, तुमच्यामधले अनेक सहकारी कधी सत्तेवर नव्हते. पण त्यांना संधी मिळाली आणि त्याने एक संदेश गेला की, प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबातल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळाल्यानंतर तोही कर्तृत्व दाखवू शकतो आणि राज्य चालवू शकतो. ती जर मालिका बघितली तर अनेकांची नावं सांगता येतील. प्रांताध्यक्ष आहेत अर्थमंत्री म्हणून त्यांनी १० वर्ष काम केलं. अनिलबाबू आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, फौज़िया खान आहेत,अनेकांची नावं या ठिकाणी घेता येतील. पण मला आठवण होते तुमच्यातल्या सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी कष्ट केले आणि दुर्दैवाने ते आज हयात नाहीत त्या आर. आर. आबांच्या बद्दल. आर.आर. पाटील सामान्य कुटुंबातले होते. मला आठवतंय की, सांगली जिल्ह्यामध्ये एके दिवशी मी होतो, तरुणांची बैठक होती. त्यात एक दोन लोक फार चांगलं बोलले. मी चौकशी केली की, हा कोण आहे मुलगा? मला सांगण्यात आलं त्यांचं नाव आर. आर. पाटील. मी बोलावून घेतलं त्यांच्याशी सुसंवाद केला, माझ्या लक्षात आलं की यांच्यात कर्तुत्व आहे. लगेचच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या, त्यांना उभं करण्याचा निर्णय झाला. नंतर विधानसभेची संधी मिळाली, तिथेही प्रभावी आमदार म्हणून त्यांनी काम केलं. दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता आली, ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आलं. नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले. त्यातून एक संदेश गेला की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबातील तरुणांना घेऊन सुद्धा त्याला संधी देतं. त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. त्यामुळे, तुम्हा सगळ्यांच्या कष्टामुळे, बांधिलकीमुळे आणि वैचारिक स्पष्टतेमुळे ही पक्षाची प्रतिष्ठा वाढली. म्हणून आजचा हा २६ वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आपल्याला संधी मिळते आहे.
केंद्र सरकारमध्ये काम करता आलं.मोजके खासदार असताना सुद्धा मी असेन,सूर्यकांता पाटील असतील, अनेकांची नावं घेता येतील. केंद्र सरकारमध्ये या पक्षाला काम करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर विरोधी पक्षामध्ये बसण्याची संधी आली, तर तिथेही प्रभावीपणाने आपण काम करू शकतो हे त्या ठिकाणी दिसलं. समाधान एका गोष्टीचा आहे की, या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळाल्यानंतर अनेक निर्णय असे घेतले की त्या निर्णयाचा परिणाम राज्यावर सुद्धा झाला.
मगाशी कोणीतरी महिला सक्षमीकरणाबद्दल बोललं. पण पहलगामच्या नंतर हा जो प्रसंग देशावर आला आणि त्यानंतर जी कारवाई करण्याची वेळ आली त्या कारवाईचे स्वरूप हे जनतेला सांगण्याचे काम दोन भगिनींनी केलं. त्या दोन्ही भगिनी देशाच्या आर्मी, नेव्ही, एअर फोर्स इथं काम करणाऱ्या होत्या. देशाला अभिमान वाटला की, सैन्यामध्ये मुलींना संधी मिळाल्यानंतर जनतेमध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनीसुद्धा करतात. आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका, नगरपालिकांच्या निवडणुका, महानगरपालिकांच्या निवडणुका दोन- तीन महिन्यांवर आलेल्या आहेत. इथे ५० टक्के भगिनींना निवडून द्यायचंय. कर्तृत्वाचा मक्ता हा फक्त पुरुषाकडे असतो यावर माझा विश्वास नाही. भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात, संधी दिली पाहिजे. ते आपण अनुभवलं. उद्याच्या निवडणुकीमध्ये ५० टक्के जागा भगिनींना द्यायच्या, तो धोरणात्मक निर्णय आपण घेतला. तो यशस्वी करण्याचं काम येत्या दोन- तीन महिन्यांमध्ये आपल्याला करायचंय.
सत्ता हातात असल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये आपण लक्ष घातलं. शेती असेल, उद्योगधंद्याचा विकास असेल, शैक्षणिक सेवेचा विस्तार असेल, सामाजिक संस्थांचा कार्यक्रम राबवायचा असेल या प्रत्येक गोष्टींमध्ये 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा'च्या कार्यकर्त्यांनी जिथे जिथे संधी मिळाली, त्यावेळेला अधिकारांचा वापर करून त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला. तुम्हा सगळ्यांनी पक्षामध्ये काही संकट आली तरी नाउमेद न होता हा पक्ष पुढे नेण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं.पक्षामध्ये फूट पडली. फूट पडावी असं कधी आपल्याला वाटत नव्हतं, पण पडली. काही मूलभूत विचारांसंबंधी अंतर झालं आणि त्यामुळे ही फूट वाढली. मी काही त्याच्यासंबंधी अधिक भाष्य करू इच्छित नाही. पण जे राहिले ते विचाराने राहिले. जे राहिले ते विचार घेऊन पुढे जनतेला, त्यांच्या सुखदुःखाला साथ देण्यासाठी राहिले. मला १००% विश्वास आहे की, उद्या निवडणुका होतील त्यावेळेला वेगळं चित्र बघायला मिळेल.
एकच उदाहरण सांगतो, साल १९८० च्या आधी माझ्या हातात सत्ता होती. सत्ता गेली, निवडणुका आल्या आणि काहीतरी ५०- ५२ आमदार निवडून आले.सहा महिन्यांच्या आत त्यातले फक्त सहाच शिल्लक राहिले, बाकी सगळे पक्ष सोडून गेले. जे सहा शिल्लक राहिले त्यातले एक मला इथे दिसतायत, त्यांचं नाव कमल किशोर कदम! ते थांबले, त्या सहांच्यामध्ये. आमचा पक्ष सहा जणांचा झाला. त्यानंतर जी निवडणूक आली तेव्हा माझ्या सहकारी आमदारांची संख्या ७२ वर गेली पुन्हा गेली. राज्य सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे फुटीची चिंता करू नका. कोण आले? कोण गेले? त्याच्याबद्दलची चिंता करू नका. आपण एकसंघ राहिलो आणि जनतेच्यावरची बांधिलकी कायम ठेवली तर काही अडचण येत नाही.
आपण या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं भाषण ऐकलं. तुम्ही त्यांच्या घरी गेलंय का कुणी? एका लहानशा घरात म्हणजे अक्षरशः एका खोलीत अशा घरामध्ये राहणारा आणि रात्री दोन-दोन-तीन-तीन वाजेपर्यंत लोकांना भेटणारा, लोकांचं काम करणारा प्रतिनिधी आणि कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. असे अनेक लोक आहेत. माझ्या मते राष्ट्रवादीचा हा ठेवा आहे, हा अतिशय मौल्यवान ठेवा आहे. तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंघ राहून विचारांना पुढे नेतील, तर सत्ता- बित्ताची चिंता करू नका. सत्ता आपोआप येईल आणि ती येण्याची स्थिती मला महाराष्ट्रामध्ये दिसतेय. एका बाजूला ही स्थिती आहे. दुसऱ्या बाजूने देशाचं चित्र पहा.
आज दोन दृष्टींनी देशाचा विचार करावा लागेल. राष्ट्रीय प्रश्न येतात, तर राष्ट्राच्या हिताच्यामध्ये राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही. ज्याचा उल्लेख सुप्रियाने केला ज्यावेळेला पहलगामला जे घडलं, काही नागरिकांची हत्या केली गेली. त्याच्यामागे कोण आहे? काय आहे? याची चर्चा देशात झाली आणि काही निकाल घ्यावे लागले. त्यावेळेला सरकारवर आम्ही टीका नाही केली. आम्ही सांगितलं की, या देशाच्या भूमीवर नागरिकांवर हल्ले होत असतील तर त्याला सामोरे जाण्याच्यासाठी शासनाने कोणतीही भूमिका घेतली तर त्याचं समर्थन आम्ही करू. इथं राजकारण आणणार नाही, तेच काम आपल्या लोकांनी केलं. आज गांभीर्याने या सगळ्या प्रश्नांचा विचार करायला हवा. सबंध देशाचं चित्र बघितलं, देशाचा नकाशा तुम्ही नजरेसमोर ठेवा. कश्मीरच्या वरच्या भागात चीन आहे. तुम्ही पुढे गेलात तर शेजारी पाकिस्तान आहे. पुढे तुम्ही गेलात तर बांग्लादेश आहे. खाली गेलात तर श्रीलंका आहे. सबंध देशाच्या आजूबाजूचे देश आणि आपण म्हणजे भारत यांच्यामध्ये आज काय स्थिती आहे? एक काळ असा होता, जवाहरलाल नेहरुंचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश म्हणून या देशाचं लौकिक होतं. आज पाकिस्तानशी आमचे संबंध चांगले नाहीत, चीनशी आमचे संबंध चांगले नाहीत. बांग्लादेश ज्याच्या निर्मितीच्यासाठी या देशाने प्रचंड त्याग केला. एका पाकिस्तानचे दोन तुकडे केले, एवढा त्याग केलेला बांग्लादेश आज आमच्या बरोबर नाही.
आज जे प्रमुख आहेत ज्यांच्या हातामध्ये बांग्लादेशचे अधिकार आहेत. माझे आणि त्यांचे व्यक्तिगत संबंध होते. ते ज्यावेळेला मंत्रिमंडळात किंवा सत्तेत होते, तर या पुणे शहरात ते माझ्याबरोबर आले होते. आणखीन काही ठिकाणी आले होते. आस्था असलेले देशाच्याबद्दल, शेजाऱ्यांच्या बद्दलचे ते गृहस्थ! पण आज बांग्लादेश भारताने त्यांच्यासाठी इतकं त्याग केल्यानंतर तोही आमचा मित्र राहिला नाही. खाली श्रीलंका तोही आमचा मित्र आहे की नाही? याची शंका यावी. त्या ठिकाणचा चीनचा प्रभाव हा चिंताजनक आहे. म्हणजे हा सबंध देश आणि त्याच्या भोवतीचे सर्व देश आणि आमच्यामध्ये सुसंवाद आहे, असं म्हणण्याची स्थिती नाही. याचा अर्थ हा आहे, देशाचं नेतृत्व करणारं घटक त्यांनी ही सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली नाही. तर त्याची किंमत देशाला द्यावी लागते. आम्ही या ठिकाणी राजकारण आणणार नाही. पण आमचा आग्रह हा आहे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस पक्ष असेल इतर डावे पक्ष असतील एकत्र बसून देशाच्या भल्यासाठी काही स्वच्छ भूमिका घेणं, हे सूत्र ठेऊन आम्ही दिल्लीच्या पातळीवर काम करत असतो. त्यामुळे हल्लीचा हा काळ काळजी करण्यासारखा आहे. एकत्र राहण्यासारखा आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्पष्ट निर्णय घेणं, असा हा आजचा काळ आहे.
देशातला शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी तरुण असेल आणि सामाजिक ऐक्य मजबूत करायचं असेल तर विविध घटक, विविध जाती, विविध जमाती, विविध भाषिक या सगळ्यांना एक प्रकारचा विश्वास द्यायचं काम आज आपण केलं पाहिजे. हे जर करू शकलो तर माझी खात्री आहे की, चित्र बदलू शकेल. पण ते बदलायला विचाराने आणि दृष्टी ठेवून काम करणाऱ्या राजकीय पक्षांची, संघटनांची ही आवश्यकता आहे. ती देण्याची ताकद, ती देण्याची दृष्टी ही 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा'च्या कार्यकर्त्यांमध्ये आहे ही अत्यंत जमेची बाब आहे. म्हणून या सगळ्या घटकांच्या हिताच्यासाठी आपण जागरूक राहूया. काहीही झालं तरी चालेल. पण काही घटक यांचं आत्मविश्वास ढळू द्यायचं नाही. समाजातला आदिवासी असेल, शेड्युल कास्ट असेल, महिला वर्ग असेल, युवक वर्ग असेल, ओबीसी असतील या सगळ्यांच्यामध्ये एक प्रकारचा विश्वास आम्ही कामातून, निर्णयातून निर्माण केला पाहिजे. ती सगळी सामुदायिक शक्ती एकत्र घेऊन समाजकारण, राजकारण करणारा पक्ष कोणता? तर तो राष्ट्रवादी आहे, ही स्थिती आपण निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठीच इथून पुढचा कालखंड तुम्ही- मी सगळ्यांनी हातात हात घालून काम करण्याचा आहे.
आनंद एका गोष्टीचा आहे पक्ष म्हणजे जी संघटना आणि संघटनेचं काम गेले आठ-दहा वर्ष अत्यंत प्रभावीपणाने जयंतरावांनी केलं. हे तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही काही वेगळी भूमिका मांडली. जयंतरावांनी माझ्याकडे सांगितलेलं आहे की, "आता नव्या पिढीला संधी द्या". तुम्ही- आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहूया. त्यासंबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे. तुमची मानसिकता वेगळी आहे, हे या ठिकाणी दिसलं. एवढंच सांगू इच्छितो की, प्रमुख सहकाऱ्यांना एकत्रित घेऊन त्यांच्याशी या विषयावरती आम्ही सुसंवाद साधू. सामूहिकपणाने या संदर्भातला निर्णय घेऊ. पण हा निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन पिढी, नवीन चेहरे हे दिसले पाहिजेत. आपण उभे करू आणि त्यांना शक्ती देऊ. माझी खात्री आहे कर्तुत्व असलेले हजारो कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत. त्यांना संधी देऊया, प्रतिष्ठा देऊया, मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो, असा प्रकारचा इतिहास हा निर्माण करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हा सर्वांची तयारी असली पाहिजे.
दोन- तीन महिन्यांत या निवडणुका येतील, त्या निवडणुकीमध्ये जिल्ह्या- जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यातलं जे नेतृत्व आहे त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या निवडणुका कशा लढवायच्या? एकट्याने लढवायच्या? काही लोकांना बरोबर घेऊन लढवायच्या? याचा विचार त्या जिल्ह्यातल्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन करण्याची वेळ आज आलेली आहे. हे जर आपण करू शकलो तर माझी खात्री आहे, आणखी एक मोठी नव्या पिढीची, नव्या नेतृत्वाची फळी ही महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या- जिल्ह्यांत दिसेल. ते काम आपल्याला करायचं आहे. हा आजचा कार्यक्रमाचा सोहळा संपल्यानंतर पुढचे तीन महिने सगळं लक्ष तुमचं तुमच्या भागामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथं नवीन नेतृत्व कसं आणायचं? ५० टक्के भगिनींच्या जागेमध्ये कर्तुत्ववान आणि आत्मविश्वासाने उभ्या राहिलेल्या मुली कशा पुढे आणायच्या? या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करा. माझी खात्री आहे की, जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी फळी आहे ती याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांच्या पाठीशी राहील. आपण येत्या तीन महिन्यांच्या निवडणुकीच्यानंतर सबंध महाराष्ट्रासमोर नवी नेतृत्व आणू आणि त्यांच्या कर्तृत्वातून इतिहास घडवू, एवढाच विश्वास बाळगतो. असा आशावाद अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
