लाल निशाण पक्षाचे भाकपा (मार्क्सवादी-लेनिनवादी ) मध्ये विलीनीकरण

Cityline Media
0
महाराष्ट्रात डाव्या चळवळीच्या ऐतिहासिक एकजूटीचा मेळावा श्रीरामपुरात उत्साहात 

श्रीरामपूर दिपक कदम-महाराष्ट्रातील डाव्या चळवळीचा एक ऐतिहासिक टप्पा नुकताच श्रीरामपूर येथे पार पडला.गेल्या तीन दशकांहून अधिक काळ राजकीय आणि तत्त्वज्ञानाच्या पातळीवर समविचारी असलेल्या लाल निशाण पक्षाचा (एल. एन. पी.) भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशनमध्ये औपचारिकपणे विलय झाला.
 येथे नुकत्याच पार पडलेल्या ऐतिहासिक एकता संमेलनात ही घोषणा करण्यात आली.एकता संमेलनास भा.क.पा. (मा-ले) लिबरेशनचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व बिहार विधान परिषदेचे आमदार कॉ. शशि यादव, केंद्रीय सदस्य व अखिल भारतीय कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. शंकर, केंद्रीय सदस्य व अखिल भारतीय प्रगतिशील महिला संघटनेच्या महासचिव कॉ. मीना तिवारी, केंद्रीय सदस्य व अखिल भारतीय ग्रामीण कामगार संघटनेचे महासचिव कॉ. धीरेंद्र झा, बिहार राज्य सचिव कॉ. कुणाल, झारखंड राज्य सचिव कॉ. मनोज भक्त, कॉ. हलदार महतो, दिल्ली राज्य सचिव कॉ. रवी राय, विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा कॉ. नेहा आणि इतर नेते उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात हिंदुत्ववादी फासीवादी शक्तींनी सामान्य जनतेच्या जगण्यावर,उपजीविकेवर आणि आत्मसन्मानावर थेट हल्ला चढविला आहे.निवडणूक आयोगाने केलेल्या मतदार यादीतील नागरिकांच्या नावांच्या वगळण्यामुळे असमतोल निर्माण झाला, आणि निवडणूक आयोग संशयाच्या भोवऱ्यात अडकला तरीही भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले, ही बाब गंभीर चिंतेची आणि अनाकलनीय आहे.
 
एकता संमेलनात बोलताना भा.क.पा. (मा-ले) लिबरेशनचे महासचिव कॉ. दिपंकर भट्टाचार्य यांनी सांगितले, "एल.एन.पी.चा इतिहास तेजस्वी आहे. महाराष्ट्र हा स्वातंत्र्य लढ्याचा अग्रगण्य भाग होता. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात कम्युनिस्ट पक्षाने घेतलेली भूमिका विशेष महत्त्वाची होती. 

भारतीय कम्युनिस्ट पक्षापासून वेगळा मार्ग स्वीकारून लोकांच्या हक्कांसाठी अधिक सक्रिय संघर्ष करण्याच्या उद्देशाने एल.एन.पी.ची स्थापना झाली."
"हीच मूल्यं नक्षलबारी, तेलंगणा आणि तेभागा या ऐतिहासिक लढ्यांमध्ये दिसून येतात. या विचारधारेमुळे एल.एन.पी. आणि भाकपा-माले जवळ आले. 

आज हीच चळवळीची परंपरा पुन्हा जागवून आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ–भारतीय जनता पक्षाच्या फासीवादी धोरणांना थोपवू शकतो. जिथे हिंदुत्वाचा उगम झाला, तिथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मही झाला. महाराष्ट्रातील शेतकरी व कामगार चळवळी आपल्याला योग्य दिशा दाखवतील."

लाल निशाणचे नेते आणि सचिवालय सदस्य कॉ. उदय भट म्हणाले, "आमचा पक्ष अनेक वर्षांपासून भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मा-ले) लिबरेशनसोबत कामगार, विद्यार्थी, महिला आणि युवकांच्या चळवळीत खांद्याला खांदा लावून कार्य करत आहे.आजचा हा विलय महाराष्ट्रात फासीवादाविरोधातील संघर्षाला अधिक बळ देणारा ठरेल. 

फुले-आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित या भूमीत ही ऐतिहासिक एकजूट अत्यंत महत्त्वाची आहे."
भा.क.पा. (मा-ले) लिबरेशनचे खासदार व अखिल भारतीय शेतकरी महासभेचे सरचिटणीस कॉ. राजाराम सिंग म्हणाले, "महाराष्ट्र ही फुले-आंबेडकरांची भूमी आहे.

 ही कम्युनिस्ट चळवळीचेही एक प्रमुख केंद्र राहिले आहे. येथील शेतकरी चळवळ देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. मात्र याच राज्यात कार्पोरेट लुटीमुळे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत."

यावेळी कॉ. दिपंकर भट्टाचार्य यांच्या फासीवादविरोधी लिखाणावर आधारित ‘फॅसिस्ट हल्ल्याविरुद्ध एकजुटीचा प्रतिकार संघटित करा’ हे मराठी पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या ऐतिहासिक विलयानंतर राज्यस्तरीय भा.क.पा. (मा-ले) अधिवेशनासाठी ३६ सदस्यांची तयारी समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये १२ सदस्यांची संचालन समितीही तयार करण्यात आली आहे. हे अधिवेशन वर्षाअखेरीस पार पडेल.

लाल निशाण पक्षाच्या वतीने नेत्यांमध्ये कॉ.उदय भट,कॉ.बाळासाहेब सुरुडे, कॉ. विजय कुलकर्णी, कॉ. अतुल दिघे, कॉ. उद्धव शिंदे, कॉ. मुक्‍ता मनोहर,कॉ. मेधा थत्ते, कॉ. बी. के. पांचाळ,कॉ. राजेंद्र बावके, कॉ.जीवन सुरुडे, कॉ. मदीना शेख, कॉ. शरद संसारे, कॉ. श्रीकृष्ण बडाख,कॉ. मधुकर नरसिंगे, कॉ. विकास अळवणी, कॉ. धोंडिबा कुंभार, कॉ. अनंत वायकर व कॉ. शंकरराव पाटील  आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!