मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क आषाढीवारी ही महाराष्ट्राची धार्मिक,सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची परंपरा आहे. या वारीत ‘दिंडी सजगतेची– आपत्ती व्यवस्थापनाची’ हा राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अभिनव आणि स्तुत्य उपक्रमाचा चित्ररथ वारीमध्ये लक्षवेधी ठरत आहे.
पंढरपुर वारी २०२५ मध्ये आकर्षक पद्धतीने सजवलेले चित्ररथ,पथनाट्य पथक,माहितीपूर्ण स्टॉल्स, मोबाईल व्हॅन आणि सुलभ भाषेतील माहितीपत्रके वापरून पूर,चक्रीवादळ,दुष्काळ,गर्दी नियंत्रण यासारख्या आपत्तींविषयी माहिती दिली जात आहे. “संकटाला घाबरू नका,सज्ज राहा” असा सकारात्मक संदेश देत ही दिंडी वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दि. १९ जूनपासून वारीबरोबर प्रारंभ झालेल्या या संकल्पनेसाठी ४ चित्ररथ असून ६० लोकांची टीम यामध्ये सहभागी झाली आहे. दि. ६ जुलै,आषाढी एकादशीपर्यंत या चित्ररथाद्वारे व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी लाखो वारकऱ्यांमध्ये आपत्ती विषयक सजगता निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.