‘एका हाताने टाळी वाजत नाही’ हे वाक्य एखाद्या नात्याच्या जबाबदारीबद्दल आणि त्या नात्यात दोघांचाही सहभाग असतो याचा गंभीर इशारा देणारं आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने ही संकल्पना केवळ सामाजिक नव्हे, तर कायदेशीर दृष्टीनेही महत्त्वाची असते हे अधोरेखित केले आहे.
लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध बनवल्याच्या आरोपात अटकेत असलेल्या २३ वर्षीय युवकाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या युवकावर ४० वर्षीय विवाहित महिलेने आरोप केला होता. युवक ९ महिने कारागृहामध्ये राहिला, तरीही त्याच्याविरोधातील आरोप निश्चित झाले नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन दिला आहे. त्याशिवाय याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिल्ली पोलिसांना फटकारले आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, जेव्हा महिला स्वतःच्या मर्जीने युवकासोबत गेली होती, मग पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा कसा नोंदवला? एका हाताने टाळी वाजत नाही. तुम्ही भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत गुन्हा कोणत्या आधारे दाखल केला? ती छोटी मुलगी नाही, ४० वर्षांची आहे. हे दोघे एकत्र जम्मूला गेले होते. जेव्हा महिला आणि युवकामध्ये संबंध सुरू होते, तेव्हा ती विवाहित होती. भलेही ती पतीपासून वेगळी राहत होती, परंतु तिचा घटस्फोट झाला नव्हता. नात्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर कायद्याचा दुरुपयोग करून असे खटले दाखल केले जातात. त्यामुळे ना केवळ कोर्टावर ताण येतो, तर या गुन्ह्यातील आरोपीच्या प्रतिमेवरही डाग पडतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने युवकाला अंतरिम जामीन देत काही अटी घातल्या. त्यात त्याने महिलेशी संपर्क करू नये आणि त्याच्या स्वातंत्र्याचा गैरवापर करू नये, असे म्हटले आहे. महिला आणि युवक पहिल्यांदा २०२१ साली सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले.
ही महिला तिच्या कपड्यांचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा शोध घेत होती. तेव्हा युवकाने तिला कन्टेन्ट बनवण्यासाठी आयफोनची मागणी केली. त्यानंतर महिलेने जम्मूच्या एका स्टोअरमधून त्याला आयफोन दिला. आरोपीने फोन विकण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये आरोपी युवक महिलेच्या घरी आला. २० हजार परत देण्याच्या बहाण्याने तिला शूटसाठी घेऊन गेला. रस्त्यात महिलेवर अत्याचार केला. आरोपी युवकाने अनेकदा ब्लॅकमेल केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी ट्रायल कोर्टात हा खटला चालवण्यास परवानगी देत आरोपीला अंतरिम जामीन दिला आहे.
कौटुंबिक वाद विवाद होतात. तसेच प्रेम प्रकरणातही वाद विवाद होतात. ब्लॅकमेलिंगचे देखील प्रकार घडतात. त्यात कधीच कुणा एकाची चूक नसते. कारण, नैसर्गिकरित्या क्रिया आणि प्रतिक्रिया घडत असतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी केवळ कुणा एकाला जबाबदार धरणे अन्यायकारक ठरू शकते. त्यामुळे एखादी गोष्ट जाणीवपूर्वक किंवा अनवधानाने घडली असली तरी टाळी एका हाताने वाजत नाही. दोघेही तेवढेच जबाबदार असतात, असा निर्णय एका प्रकरणात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
ॲड. गायत्री कांबळे