नाशिक दिनकर गायकवाड-नियमितच्या पावसामुळे सराफ बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबते त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेचे अधिकारी व नाशिक महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांवर आ.प्रा. देवयानी फरांदे यांनी नाराजी व्यक्त केली.याबाबत सुधारणा करण्यात न आल्यास अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
सराफ बाजार परिसरातील पाणी तुंबल्याच्या घटनेची पाहणी करताना आ. प्रा.देवयानी फरांदे यांनी हा इशारा दिला. यावेळी नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल,अधीक्षक अभियंता धारणकर, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, उपअभियंता नितीन राजपूत, बोरसे, स्मार्ट सिटी योजनेचे प्रकल्प प्रमुख आशिष सूर्यवंशी, सूरज सूर्यवंशी आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.देवयानी फरांदे म्हणाल्या,नाशिक शहरात पाणी तुंबल्याच्या घटना घडू नये,म्हणून पावसाळा सुरू होण्यापूर्वी बैठक घेण्यात आली होती. तेव्हाच चांगल्या प्रकारे नालेसफाईची कामे व्हावी,अशा सूचना करण्यात आलेल्या होत्या.तरीही सराफ बाजार परिसरात पाणी तुंबल्याची घटना घडली व हे पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन मोठे नुकसान झाले.
नाशिक महानगरपालिका व स्मार्ट सिटी योजनेने यात सुधारणा करणे गरजेचे आहे. आपण दोन दिवसानंतर पुन्हा एकदा या परिसरास भेट देणार असून कामकाजात सुधारणा न झाल्यास सक्त कारवाई करणार असल्याचा इशारा आ.फरांदे यांनी दिला.
स्मार्ट सिटी योजनेच्या सल्लागारांनी लोकप्रतिनिधींना विरोध करून देखील सराफ बाजार व नेहरू चौक परिसरात भूमिगत गटार योजनेत बदल केल्यामुळे या भागात ही समस्या निर्माण झालेली असून या भागात ही समस्या निर्माण करणाऱ्या अधिकारी व सल्लागारांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे मंडलाध्यक्ष सचिन मोरे, शिवा जाधव, निखिल सरपोद्दार, पवन गुख, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे,नरेंद्र गर्गे आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
