नाशिक दिनकर गायकवाड सातपूर औद्योगिक वसाहतीतील ट्रॅक कंपोनंट्स कंपनीच्या विरोधात कामगारांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज सोमवारी (दि. २) सकाळी ११ वाजता नाशिक ते मंत्रालय असा पायी चड्डी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत मार्शल संघटित असंघटित कामगार संघटनेचे संस्थापक प्रशांत खरात यांनी दिली.
कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सातपूरच्या कामगार उपायुक्त कार्यालयापासून सकाळी ११ वाजता मंत्रालयाकडे रवाना होणार असून,या पायी चड्डी मोर्चात १०० हून अधिक कंपनीतील कामगार सहभागी होणार असल्याचे खरात यांनी सांगितले.
तसेच कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षितता मिळावी, यासाठी कंत्राटी कामगार कायद्यात बदल करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. स्थानिक कामगारांवर अन्याय करणाऱ्या कंपनीचे बेकायदेशीर कंत्राट रद्द करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. कंपनीने ४० टक्के भूभागात अतिक्रमण केल्याचा अरोप करत कंपनीने केलेले
अतिक्रमण तत्काळ हटवण्यात यावे, अनधिकृत पार्किंग बंद करण्यात यावी आणि पर्यावरण नियमांकडे दुर्लक्ष करून झालेल्या वृक्षतोडीप्रकरणी तातडीने कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. कामगारांनी आरोप केला आहे की, युनियन स्थापनेनंतर मनात राग धरून कंपनीने अनेक कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केले आहे. या सर्व कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात यावे आणि युनियनशी संबंधित सर्व कामगारांना कायमस्वरूपी करण्यात यावे, अशी मागणीही केली गेली आहे.
कामगारांना सर्व कायदेशीर सुविधा व शासकीय सवलती मिळाव्यात, कंपनीत घडलेल्या अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही पुढे आली आहे. तसेच कंपनीत सुरू असलेले बेकायदेशीर कामकाज तत्काळ थांबवण्यात यावे यांसह प्रशासनाने कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही खरात यांनी सांगितले.