नाशिक दिनकर गायकवाड फेसबुकवरून हाफको ऑईलचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून एका इसमाकडून ५६ लाख रुपये घेऊन फसवणूक करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वैशाली प्रशांत पाटील (रा. मातोश्री अपार्टमेंट, उंटवाडी, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांचे पती प्रशांत साहेबराव पाटील यांच्या फेसबुक ॲपवर फेसबुक यूआरएल अकाऊंट, मेल आयडी व अज्ञात मोबाईल क्रमांकावरून पाटील यांना एक मेसेज आला.
अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाने फिर्यादीच्या पतीला हाफको ऑईलचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखविले.त्यानंतर फिर्यादीचे पती व त्यांचे मित्र राजेश जीवन जाधव, हरिश्चंद्र पांडू भरसट व मोहित संदीप एखंडे यांची एकूण ५५ लाख ७९ हजार ३०० रुपयांची रक्कम आरोपीने सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये भरण्यास भाग पाडून प्रशांत पाटील यांची फसवणूक केली, तसेच फिर्यादीच्या पतीने ही रक्कम वर्ग करण्यासाठी जवळ जवळ सर्व रक्कम कर्जाऊ घेतली असून, ही कर्जाऊ रक्कम कशी
परत करायची, यामुळे आलेल्या तणावातून फिर्यादीच्या पतीने आत्महत्या केली. नमूद फेसबुक आयडीधारक, मेल आयडीधारक, मोबाईलधारक व रक्कम वर्ग करण्यासाठी बँक खाते उपलब्ध करून देणाऱ्या खातेदारांनी आपसात संगनमत करून फिर्यादीच्या पतीने वर्ग केलेली रक्कम परत न करता त्यांची एकूण ५६ लाख रुपयांची फसवणूक करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.