मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास - समुह स्वयंपुर्नर्विकास अभ्यासगटाचा अहवाल मुदतीच्या आधीच सादर केला आहे. अभ्यासगटाने शासनाला सादर केलेल्या सूचना गृहनिर्माण, सहकार, नगरविकास विभागाकडे पाठवून विभागांच्या सूचनांवर आधारित प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येईल.
अभ्यासगटाने स्वीकार केलेल्या निर्णयांबाबतीत शासन निर्णय लवकरच निर्गमित करुन आगामी अधिवेशनात याबाबत झालेल्या कामाचा अहवाल सादर करण्यात येईल. यातील महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे राज्यातील प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामांना गती मिळून मुंबईकरांच्या स्वप्नातील सुंदर व मोठ्या घरांचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विधानभवन येथे सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुर्नर्विकास - समुह स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचा अहवाल शासनास सादर करण्याबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, आमदार प्रविण दरेकर, सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास - समुह स्वयंपूर्ण विकास अभ्यासगटाचे सदस्य उपस्थित होते.