जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिया मित्तल यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान
नाशिक दिनकर गायकवाड-जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा तत्त्वावर ज्येष्ठता यादीत प्रतिक्षेत असलेल्या ३४ उमेदवारांना गट ड संवर्गात तर सध्या अनुकंपा तत्त्वावर कार्यरत असलेल्या गट ड मधील पात्र ६ कर्मचाऱ्यांना गट क मधील पदावर अशा ४० उमेदवारांना सीईओ आशिमा मित्तल यांच्या हस्ते काल जिल्हा परिषदेच्या स्व.रावसाहेब थोरात सभागृहातील कार्यक्रमात नियुक्ती आदेश देण्यात आले.
नाशिक जिल्हा परिषदेत गट ड संवर्गातील एकूण ४८ कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. यातील पात्र ३४ उमेदवारांना समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्यात आली. उर्वरित उमेदवारांना पुढील रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार संधी देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे गट ड मधील पात्र ६ कर्मचाऱ्यांना गट क मध्ये पदोन्नती देण्यात आली असून ४ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहायक (लेखा), एका कर्मचा-यास वरिष्ठ सहायक (लेखा), तर एका कर्मचाऱ्यास पर्यवेक्षिका म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
समुपदेशनावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ संजय शिंदे, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील आदी उपस्थित होते.
यासाठी सामान्य प्रशासन विभागातील सहायक प्रशासन अधिकारी अनिल गिते, कनिष्ठ प्रशासन अधिकारी राजेंद्र येवला,वरिष्ठ सहाय्यक शितल शिंदे यांनी परिश्रम घेतले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत प्रमाणिकपणा, नियमितता आणि कार्यक्षमता याआधारे काम करत प्रशासकीय कामकाज करावे. प्रशासनात काम करता असताना कर्मचाऱ्यांना वेळोवेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशावेळी आपले सहकारी व वरिष्ठ यांच्याकडे आपल्या समस्या सांगाव्यात.
आपण प्रशासनास उत्कृष्ट सेवा द्यावी, असे आवाहनही मित्तल यांनी केले. नवनियुक्त कर्मचाऱ्यांना यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या समजावून देण्यात आल्या आणि कार्यालयीन कामकाजाच्या प्रक्रियेबद्दल तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
