आंबेगाव सिटीलाईन न्यूज नेटवर्क पुणे जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आंबेगाव तालुका मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे लोणी(धामणी) येथे नुकतेच उद्घाटन पार पडले.
यावेळी कार्यालयाचे उद्घाटन करून आंबेगाव विधानसभेचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.
पक्षाच्या जडणघडणीत कार्यकर्ता हा केंद्रबिंदू असतो. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गाव पातळीवरील लोकहितोपयोगी कामे लोकप्रतिनिधींना मार्गी लावणे सहज सुलभ होते. त्याच भावनेतून लोणी येथे उभारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील गावांमधील सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागण्यास चांगली मदत होईल. कार्यकर्त्यांनी गाव पातळीवरील सामाजिक कामांबरोबरच पक्ष सभासद नोंदणीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. गावागावातून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून पक्ष संघटन मजबूत करावे.
महायुती सरकारच्या माध्यमातून विविध प्रभावी योजना व ऐतिहासिक निर्णय घेतले जात असून या योजना तसेच गावागावात राबविण्यात येणारी विविध विकास कामे याबाबत सर्वसामान्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे व प्रसिद्धीचे काम राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जागरूक राहून पार पाडावे असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.