नाशिक दिनकर गायकवाड नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री येथील फिर्यादी धनंजय जोमाने यांच्या घरात कडी कोयंडा तोडून घरफोडी करीत सोन्याचे दागिने व रोकड असा २ लाख ५५ हजारांचा ऐवज लंपास केला होता.या गुन्ह्यातील चोरट्याने केलेल्या हालचालींचा बारकाईने अभ्यास करून पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील खडकी येथील एका गुन्हेगाराला ताब्यात घेतले आहे.
सय्यद पिंप्री येथील या घरफोडी संदर्भात नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांच्या पथकाने आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत व घटनास्थळावर सापडलेल्या तांत्रिक बाबींच्या विश्लेषणानंतर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधाराने तपास पथकाने सराईत गुन्हेगार योगेशकुमार देविदास तायडे (रा. वय ४३, हल्ली रा. रीगल हिल, खडकी, पुणे) याला शिताफीने ताब्यात घेतले.त्याची कसून चौकशी केली असता मोटर सायकलवर सय्यद पिंप्री या गावी जाऊन बंद घराची टेहळणी करून त्याने धनंजय जोमाने यांचे बंद घर फोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू, रोख ३४ हजार ५०० रुपये असा सुमारे ४ लाख ६८ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
घरफोडी करणारा आरोपी तायडे याच्यावर यापूर्वी खडकी पोलीस ठाणे येथे खून व शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. तसेच उपनगर पोलीस ठाणे नाशिक शहर येथे देखील चोरीचा गुन्हा दाखल आहे. या तपासाकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे, पोलीस अंमलदार निलेश मराठे, योगेश पाटील, अरूण अहिरे, नवनाथ आडके, नंदू सानप, संतोष घोडेराव, विकास कराड, पोलीस हवालदार संदीप नागपुरे, सचिन गवळी,धनंजय शिलावटे, हेमंत गिलबिले, प्रदीप भैरव, नितीन गांगुर्डे आदींच्या पथकाने परिश्रम घेतले.