नाशिक दिनकर गायकवाड आडगाव शिवारातील कोणार्क नगर येथील सेल्फी पॉईंटजवळ सोनसाखळी हिसकावून पळून जाणाऱ्या आंबिवली (कल्याण जि. ठाणे) येथील चोरास आडगाव पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले आहे.
बळी मंदिर राणेनगर-गोविंदनगर- सिटी सेंटर मॉल कामटवाडे एक्स्लो पॉईंट असा तब्बल २७ किलोमीटर थरारक पाठलाग करून एकास पकडण्यात आले आहे.तर दुसरा साथीदार पळून जाण्यास यशस्वी ठरला आहे. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी या पथकास ५० हजारांचे रिवॉर्ड जाहीर केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अली हसन अफसर जाफरी (वय २५, रा. सुपर स्टार बेकरीच्या मागे,पाटीलनगर,आंबिवली, कल्याण, ठाणे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून गुन्ह्यात
वापरलेली एन. एस. २०० मोटारसायकल, मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १० गुन्हे दाखल आहेत.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, शोभा नहिरे (वय ५५, रा. नांदूर लिंक रोड) या मंगळवारी दुपारी गणेश मार्केट चौकातून पतीसह भाजी घेऊन जात असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकल वरून हेल्मेट परिधान करून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने ८० हजार रुपयांचे मंगळसूत्र खेचून पळ काढला.
चेन स्नॅचर मंगळसूत्र खेचून जत्रा हॉटेलच्या दिशेने पळून गेल्याची माहिती मिळताच सीआर मोबाईल वरील हवालदार निलेश काटकर, गुंबाडे यांनी ही माहिती आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे हवालदार रावजी मगर, वाघचौरे यांना कळविले.
ते लागलीच बळीमंदिर येथे येऊन थांबले असता दोघे संशयित हे बळीमंदिर येथून उड्डाण पुलावर चढताना दिसले. तेव्हा चौघा पोलिसांनी एकाच वाहनातून त्यांचा
पाठलाग सुरू केले. दुचाकीवरील चोरटे वेगाने जात असतानाही पोलिसांनी बळी मंदिर -राणेनगर - गोविंदनगर- सिटी सेंटर मॉल - कामटवाडे एक्स्लो पॉईंट
असा थरारक पाठलाग केला.
अंबड औद्योगिक वसाहतीत गाडी रस्त्याचे बाजुला पार्क करुन अंगातील काळया रंगाचे जॅकीट काढले व हेल्मेट काढून पळू लागले. तेव्हा हवालदार निलेश काटकर, गुंबाडे, रावजी मगर, वाघचौरे यांनी त्यांचा पाठलाग करुन अली हसनला ताब्यात घेतले. मोबाईल व मोटारसायकलही पोलिसांच्या हाती लागली.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त संगिता निकम, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे, सहाय्यक निरीक्षक निखील बोंडे यांनी पोलीस पथकाच्या धाडसाचे कौतूक केले आहे. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी या पथकास ५० हजारांचे रिवॉर्ड जाहीर केले आहे.
