नाशिक दिनकर गायकवाड केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान आत्मनिर्भर निधी अर्थात पीएम स्वनिधी योजनेतून लाखो फेरीवाल्यांना स्वावलंबी होण्याचे संधी मिळाली आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या योजनेचे ऑनलाईन पोर्टल बंद आहे.त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची प्रकरणे अडकून पडली आहेत. नव्या अर्जदारांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे हे पोर्टल पुन्हा सुरू करण्याची मागणी श्रमशक्ती कामगार संघटनेने केली आहे.
सन २०२० मध्ये केंद्र सरकारकडून पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली. या अंतर्गत शहरातील फेरीवाल्यांना तीन टप्प्यात कमी व्याजदरात अनुदानित कर्ज मिळत होते. पहिल्या टप्प्यात १२ महिन्यांच्या किडीसाठी १० हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात २० हजार रुपये १८ महिन्यांसाठी आणि तिसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपये मिळत असल्याने हॉकर्स फेरीवाल्यांना या पीएम स्वनिधीचा मोठा आधार मिळत होता.
हॉकर्स फेरीवाले यांचे छोटे व्यवसाय असतात.अनेक हॉकर्स फेरीवाले हे सीझन प्रमाणेच आपला व्यवसाय करीत असतात. त्यांना भांडवलाकरिता मोठी अडचण निर्माण होते. नाईलाजास्तव खासगी सावकारांकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. यामुळे अनेक हॉकर्स फेरीवाल्यांवर मोठे आर्थिक संकट निर्माण होते; परंतु राष्ट्रीय फेरीवाला धोरणाकरिता केंद्र सरकारने पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कमी व्याजदरामध्ये छोट्या हॉकर्स फेरीवाल्यांना त्वरित कर्ज मंजूर होत होते. ते गेल्या सहा महिन्यांपासून हे पोर्टल बंद झाल्याने अनेक छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट निर्माण झाले असून, याकरिता श्रमशक्ती कामगार संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.
हे पीएम स्वनिधी पोर्टल लवकरात लवकर सुरू करून अधिकृत हॉकर्स फेरीवाल्यांना पीएम स्वनिधीचा लाभमिळवून देण्याकरिता मदत करावी, अशी मागणी श्रमशक्ती कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वसंत ठाकूर, संघटनेचे अध्यक्ष संतोष दाते, अक्षय परदेशी, देवीदास वाबळे, किशोर देशमुख, धोंडीराम बोडके, दत्ता कासार, संतोष हिवाळे,अहमद पटेल, मोबीन शेख, प्रशांत भुजबळ, नितीन थोरात, रणजित परदेशी व दीपक भालेराव यांनी केली आहे.
