नाशिक दिनकर गायकवाड मनमाड येथील नगर चौकी जवळील रेल्वे गेट क्रमांक ८२ येथे एक दुर्दैवी घटना घडली. हुबळी वरून येणाऱ्या मुजफ्फरनगर एक्सप्रेस गाडीच्या धडकेने भारताच्या राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेच्या वेळी रेल्वे फाटक बंद होते आणि अनेक वाहनचालक व स्थानिक नागरिक रस्त्यावर थांबले होते.याच दरम्यान, जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावरून उडत आलेल्या मोराला धावत्या गाडीने जोरदार धडक दिली.काही क्षणांसाठी गाडी गेटजवळ धिमी झाल्याने नागरिकांनी मोर धडकून वरती लटकताना पाहिला.थोड्याच वेळात तो खाली कोसळला.
घटनेचे साक्षीदार असलेले शिवसेना उपशहर प्रमुख संजय दराडे, रमेश काकड, बापू दराडे, रमेश जाधव, संजय राऊत व इतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोराला रेल्वे पटरीवरुन अलगद बाजूस हलवले. त्यावेळी मोर गंभीर जखमी अवस्थेत होता.नागरिकांनी त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला,मात्र काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.आणि लोकांच्या काळजात धस्स झाले.
यासंदर्भात वनविभागास माहिती देण्यात आली असून वनरक्षक सोनाली वाघ आणि वनकर्मचारी अंकुश गुंजाळ यांनी घटनास्थळी हजर राहून मृत मोराची पाहणी केली.पुढील वैद्यकीय तपासणी आणि कायदेशीर कारवाईसाठी मृत मोर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
