नाशिक दिनकर गायकवाड आदिवासी विकास विभागाच्या नाळेगाव,शिरसगाव व मुरंबी आश्रम शाळेत रान भाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून विषमुक्त रानभाज्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी विविध प्रकाराच्या रानभाज्या बनवून महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.महोत्सवात विद्यार्थ्यांनीही विविध रानभाज्यांची चव चाखली.
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शिरसगाव व मुरंबी यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापक दिपक भास्कर व शितल खंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रानभाज्या महोत्सव व आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे उद्घाटन शिरसगावचे सरपंच भागिरथी महाले यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते हिरामण महाले, अधिक्षक प्रभाकर शिंदे, अरुण बागले, पुणम बावणे, सिता भोये, श्रीराज अथीलकर, संदीप रुपणर, सुहास डोंगरे, अमोल कोपरेकर, सुभाष अस्वले, कृष्णा बाजकर, किरण राऊत, किसन टबाले, मनोहर जाधव आदींसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.
रानभाज्या व आनंद महोत्सवात प्रत्येक वर्गातील विद्यार्थी व शिक्षक तसेच पालक यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे रानभाज्याचे स्टॉल लावण्यात आले होते. माध्यमिक शिक्षक सिद्धार्थ भोगले व प्राथमिक शिक्षक दौलत लहारे यांनी या भागातील वनामध्ये पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्या व त्यांचे आहारातील महत्त्व सांगितले. दरम्यान, रानभाज्या आणि इतर पदार्थ बनवून विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आनंद लुटला.