नाशिक दिनकर गायकवाड सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून त्याद्वारे जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघां सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलीस खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मल्हारखाण, अशोकस्तंभ येथील रहिवासी अर्जुन संपतराव पगारे यांनी गंगापूर पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती, की आरोपी राहुल पवार याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ अपलोड केला. त्या व्हिडिओत राहुल पवार यांनी अर्जुन पगारे यांना अश्लील शिवीगाळ करून संपूर्ण कुटुंब संपवून टाकण्याची धमकी दिली होती.
याबाबत त्यांनी गंगापूर पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती.या घटनेतील प्रमुख आरोपी राहुल पवार याला नाशिक शहरातून तडीपार करण्यात आले असूनही तो शहरात राहून धमक्या देत होता.त्याची तातडीने दखल घेऊन गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी वरिष्ठांची मान्यता घेऊन गंगापूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि खंडणीविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांचे एक अशी दोन पथके आरोपींच्या शोधासाठी पाठविली.
या पथकांनी गोवर्धन गाव येथे सापळा रचून मुख्य तडीपार आरोपी राहुल मच्छिंद्र पवार (रा. गंगापूर गाव, गोवर्धन) यास गोवर्धन येथे सापळा रचून अटक केली, तर अन्य एक आरोपी योगेश ऊर्फ ॲण्डी चंद्रकांत पांडे (वय ३२, रा. योगीदर्शन अपार्टमेंट, ओझर) यास ताब्यात घेतले, तसेच तिसरा आरोपी एकनाथ ऊर्फ एक्का किसन तिटकारे (वय ३२. रा. वाकी डहाळेवाडी, ता. इगतपुरी) यास घोटी परिसरात ताब्यात घेतले.
याप्रमाणे तीनही आरोपींना अटक करून कोर्टासमोर उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन हे करीत आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ १ च्या उपायुक्त मोनिका राऊत, सरकारवाडा विभागाचे सहाय्यक पोलीस
आयुक्त नितीन जाधव व गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी या यशस्वी कामगिरीबद्दल गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार गिरीश महाले, रवींद्र मोहिते, गणेश रेहेरे, अंमलदार सोनू खाडे, सुजित जाधव, गोरख साळुंके, तुलसी चौधरी, मच्छिंद्र वाक्चौरे, मुकेश गांगुर्डे, विजय नवले, तसेच खंडणीविरोधी पथकाचे उपनिरीक्षक सगळे, हवालदार चकोर, योगेश चव्हाण, पोलीस नाईक जगझाप, सोनवणे, दिघे व अंमलदार भगवान जाधव, राऊत, निकम आदींचे अभिनंदन केले आहे.
