पंढरीची वारी सनातन्यांची घुसखोरी

Cityline Media
0
-वारकरी कदापीही धारकरी होऊच शकत नाही 
-वारकरी संप्रदायाच्या विचारांची प्रतिकृती म्हणजे संविधान 

आधूनिक भारताचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात "तुकोबाची गाथा आणि ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी सोडून जगातले सगळे धर्मग्रंथ पाण्यात बुडाले तर मला किंचितही दुःख होणार नाही" बाबासाहेबांची वारकरी संप्रदायाच्या संतांवरील ही आढळनिष्ठा बहुजन समाजामध्ये जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत इथल्या लोकशाहीला कोणीही धक्का लावू शकत नाही. शांततेच्या मार्गानेच स्थायी स्वरूपाचे परिवर्तन घडवून येऊ शकतं असा ठाम विश्वास वारकरी संप्रदायाच्या संतांनी प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामनामध्ये निर्माण केलेला आहे आणि जोपर्यंत हा विश्वास वारकऱ्यांमध्ये आहे तो पर्यंत इथला कोणताही वारकरी हा कधीही धारकरी होऊ नाही.
भारतीय संविधानात पंढरीचा पांडुरंग म्हणजे समतेचं अधिष्ठान हे वारकरी संप्रदायाच्या संतांनी रुजवलेल्या समतेच्या मूल्य रूपात अधिष्ठित आहे त्याला जर कोणी समरसतेची झूल पांघरत असेल तर महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय हे कदापी खपवून घेणार नाही.

वारकरी संप्रदायाच्या संतांच्या विचारांची प्रतिकृती म्हणजेच भारतीय संविधान होय. "भारतीय संविधान विदेशी मूल्यो पर आधारित है" असं सरसंघ चालक मा.मोहनजी भागवत म्हणतात. तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकऱ्यांनी त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे की समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि सामाजिक न्याय या मूल्यांची बीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यपूर्वी महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या संतांनी रुजवली आणि म्हणून स्वर्गालाही ठेंगणं वाटेल असं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं.

 त्यामुळे तुकोबा, शिवबा,ज्योतिबा, आणि बाबा या चार स्तंभावर भक्कमपणे उभी असलेली ही लोकशाही अबाधित राहण्यासाठी तुम्ही आणि मी सगळ्यांनी प्राणपणाने लढले पाहिजे मग तो आंबेडकरी असो की वारकरी. 

वारकरी संप्रदायाच्या साहित्यात हिंदू हा शब्द नाही त्यामुळे त्याकाळी जो काही धर्म होता तो सनातन वैदिक धर्म किंवा ब्राह्मण धर्म होता आणि त्या धर्माचा वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्माशी काहीही संबंध नाही. वारकरी संप्रदायाच्या संतांनी या सनातन वैदिक धर्माला पर्याय म्हणून भागवत धर्म दिलेला आहे.

या वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्माची व्याख्या ही सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येपेक्षा संपूर्ण वेगळी आहे.सावरकरांनी केलेली व्याख्या म्हणजे एक डबकं होय. ज्याची पुण्यभूमी आणि पितृभूमी भारत तोच हिंदू राष्ट्राचा नागरिक असणार आहे. सावरकरांच्या या व्याख्येला जगातल्या इतर देशांनी प्रत्युत्तर दिले तर भारतात जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे त्यापेक्षाही जास्त आत्महत्या आपल्या देशामध्ये डॉक्टर आणि इंजिनियर यांनी केल्या असत्या कारण आपल्या देशातील परदेशात असणारे डॉक्टर आणि इंजिनियर लाखो करोडो रुपयांचे पॅकेज घेतात परदेशात नोकरी करतात आणि भारतात पैसे पाठवतात ही सर्वात मोठी देशभक्ती आहे.

सावरकरांच्या कलुशीत व्याख्येनुसार त्यांचं नागरिकत्व रद्द केलं तर हे हिंदुत्वाचं गारुड आपल्या उच्चशिक्षित मुलांचे आयुष्य बरबाद करणारी बारूद ठरणार आहे हे नव्याने आपण समजून घेतलं पाहिजे. भागवत धर्माची व्याख्या ही सागरासारखी विशाल आणि व्यापक आहे.

 माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात "हे विश्वचि माझे घर"अर्थात वारकऱ्यांच्या भागवत धर्माला भेदाभेदाच्या भिंती नाही. आज आपण ग्लोबल झालो परंतु ८०० वर्षाच्या पूर्वी वारकरी संप्रदायाच्या संतांनी ठेवलेला विचार हा किती आधुनिक, व्यापक, सर्वसमावेशक आणि कालातीत होता हे आपल्याला मान्यच करावे लागेल.

नव हिंदुत्ववादी सनातन वैदिक धर्म आणि भागवत धर्म याची सर मिसळ करत असताना आपल्याला दिसतात. वारकरी संप्रदायाचे हे होत असलेलं वैदिकीकरण थांबवणे ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. 
पंढरीच्या वारीत सनातनी घुसखोरी का करतात?कारण त्यांना वारकरी संप्रदायाचा समतेचा विचार संपवून त्या ठिकाणी समरसतेचा ढकोसला आणायचा आहे.

समरसता म्हणजे काय तर "वाघे उपदेशीला कोल्हा सुखे खाऊ द्यावे मला| देह तव जाणार काही घडेल परोपकार' अर्थात वाघाने कोल्ह्याला उपदेश केला की नाही तरी तू मरणारच आहे मला खाऊ दे मेल्यानंतर तुला माझं समाधान केल्याच पुण्य लाभेल शेवटी कोल्हा हा वाघाशी 

समरस झाला "पाया पडती जन एकमेका" ही समता नव हिंदुत्ववाद्यांना नको असून त्यांना एकचालकानूवर्ती म्हणजे एकाने आदेश द्यायचा आणि दुसऱ्यांनी त्याचा पालन करायचं प्रश्न विचारायचे नाही त्यामुळे समरसता म्हणजे माणसाचा माकड करणारी सर्वोत्कृष्ट कार्यशाळा होय.

ज्या वैदिक सनातन धर्म नियमाने वारकरी संप्रदायाचा ज्या नामदेवरायांनी पाया रचला त्या नामदेवाला तुच्छ लेखले, माऊली ज्ञानदेवांना बहिष्कृत केले, तुकोबाला देहासकट वैकुंठाला पाठवले त्या सनातन वैदिक धर्माच्या पाठीशी महाराष्ट्रातला कोणताही वारकरी उभा राहू शकत नाही.

वारकरी संप्रदायाच्या सगळ्या संतांनी या ब्राह्मणीकरणाला विरोध केलेला आहे. वैदिक सनातनी धर्मातील यज्ञ यागाधी कर्मकांडाच्या समाचार वारीत घेतला तर या वारीत घुसलेले सनातनी किंवा काही वारकरीच सनातनी झालेले आहे ते इस्लामच्या विरुद्ध बोला आमच्या धर्माचे विरुद्ध का बोलता असा कांगावा करतात.

त्या सर्व नव हिंदुत्ववाद्यांना मला सांगायचं आहे की काल्पनिक शत्रू उभे करू नका.शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद हा वारकरी विचार तुम्हाला पचणारा नाही. तुम्हाला त्याच्या उलट्या होईल. पण वारकरी संतांनी केलेली सनातन धर्माची चिकित्सा वेदांची चिकित्सा तो विचार वारीत मांडण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही.

सनातन वैदिक धर्माप्रमाणे तुम्हाला पुत्र कामेष्टी यज्ञ करून बाळं जन्माला घालायची आहे किंवा मंत्रोपचाराने सोयाबीनचे पीक वाढवायचं आहे काय तमाशा करायचा आहे तुम्ही करा परंतु तुकारामाचा आणि ज्ञानदेवाचा शेतकरी "योग याग विधी येणं नव्हे सिद्धी" हा विज्ञाननिष्ठ चमत्काराचा खरपूस समाचार घेणारा विचार मानणारा असल्यामुळे वारकरी असला बावळटपणा करणार नाही.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना लोकायत अर्थात चार्वाकांच्या विचाराचा स्पर्श झाला नसता तर फुल्यांनी शाळा काढल्या नसत्या आणि फुल्यांनी शाळा काढल्या नसत्या तर मनिषा कायंदे यांना राज्याच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची संधी मिळाली नसती.

हातात चप्पल घालून चालावं लागलं असतं चप्पल घालण्याची सुद्धा परवानगी मिळाली नसती त्यामुळे सनातन धर्माचा जो पुळका तुम्हाला आलेला आहे तो संयुक्तिक नाही. दुसऱ्या बाजूने वारीत कोणीही नक्षलवादी नाही तुमची नक्षलवाद्यांची व्याख्या म्हणजे जो सरकारच्या विरोधी असेल तो नक्षलवादी.

आज ज्ञानोबाराय असते आणि त्यांनी "देव ते कल्पित शास्त्र ते शाब्दिक पुराने ही सकळीक बाष्कळची" अर्थात देव हे कालोकल्पीत आहे शास्त्र हे शब्दाचे जंजाळ आहे आणि पुराने म्हणजे बाष्कळ बडबड होय असे आपले निर्भीड विचार मांडले असते तर तुम्ही माऊलींना सुद्धा नक्षलवादी ठरवलं असतं. 

मनीषाताई वारीचा आणि प्रबोधनाचा अतूट संबंध आहे या महाराष्ट्रात प्रबोधनाची परंपराच वारकरी संप्रदायाच्या संतांनी निर्माण केली आहे त्यामुळे वारीमध्ये जाऊन कोणी संवैधानिक मूल्यांचा प्रचार प्रसार करत असेल तर त्याला नक्षलवादी ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला.

राहिला प्रश्न नास्तिकांचा तर नास्तिक ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? तुका म्हणे मूढजना देव देही का पाहीना  वारकऱ्यांचा पांडुरंग जसा पंढरपुरात आहे तसा तो सर्वसामान्यांमध्ये आहे. तुम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते न पाळणे ही अनास्था म्हणजे खरी नास्तिकता होय कारण तुकोबा, ज्ञानोबाचा देव शेतकऱ्यात आहे.त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कृपेने सत्तेत बसलेलं आणि जनता जनार्दनां विषयी कुठलेही प्रकारची आस्था नसलेलं महाराष्ट्राचं हे फडणवीशी सरकार खऱ्या अर्थाने नास्तिक आहे. त्यामुळे तुम्ही वारकऱ्यांना शहाणपणा शिकवू नका वारकऱ्यांचा कोणीही बुद्धीभेद करू शकत नाही आणि तुम्ही महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक आणण्याची जी धमकी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वारकऱ्यांना सर्वसामान्यांना दिलेली आहे त्याला महाराष्ट्रातला कोणताही वारकरी भीक घालणार नाही. वारकरी लाचार नाही त्यांने कुठलेही पन्नास खोके घेतलेली नाही त्यामुळे तुम्ही हे सांस्कृतिक दहशतवाद्यांचे लांगुलचालन करणारे विधेयक आणा महाराष्ट्रातला  प्रत्येक वारकरी त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्याशिवाय राहणार नाही.

हेमंत टाले
अमरावती फोन नं.9975807632
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!