शहरातील तीन विवाहितांचा छळ,सासरच्यांविरुद्ध गुन्हे दाखल
नाशिक दिनकर गायकवाड शहरातील तीन विवाहितांचा विविध कारणांतून छळ करण्यात आला असून, या प्रकरणी पतीसह सासरच्या नातेवाईकांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
छळवणुकीचा पहिला प्रकार पंचवटीत घडला.फिर्यादी महिला ही अंबड परिसरात राहते. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला मारहाण केली,तसेच फिर्यादी राहत असलेल्या रूममधून सर्व संसारोपयोगी साहित्य, सोने, कागदपत्रे घेऊन विवाहितेला एकटे सोडून निघून गेले.
याबाबत फिर्यादीला कल्पना देत नसल्याने या त्रासाला कंटाळून फिर्यादीने अंबड पोलीस ठाण्यात विवाहितेने पतीसह नणंदेसह फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टोपले करीत आहेत. छळवणुकीचा दुसरा प्रकार पुणे येथे घडला. लग्नात मानपान दिला नाही म्हणून विवाहितेचा पती, सासू, सासरे, नणंद, नंदोई,
मामेसासरे व त्यांचा मुलगा यांनी संगनमत करून विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिचा छळ केला, तसेच नवीन घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून ३० लाख रुपये आणत नाही तोपर्यंत आमच्या घरात पाय ठेवायचा नाही, असे बोलून विवाहितेला नांदविण्यास नकार दिला.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक संगम करीत आहेत. विवाहितेच्या छळाचा तिसरा प्रकार उपनगर परिसरात घडला. गाळा घेण्यासाठी माहेरून वडिलांकडून दोन लाख रुपये आणत नाही, तोपर्यंत तुला नांदविणार नाही, असे म्हणून विवाहितेबा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू-सासरे व दीर (सर्व रा. मु. पो. ता. अकोले, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गोसावी करीत आहेत.
