विठाबाई नारायणगावकर तमाशा क्षेत्रातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व होय.नुकत्याच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमुळे प्रेक्षकांना नव्या पिढीला विठाबाईची नव्याने ओळख होत असली तरी विठाबाईंचे तमाशातील योगदान वाखण्याजोगे आहे.
राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई भाऊबापू नारायणगावकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य कलेसाठी समर्पित केले.तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करताना त्यांचे कला क्षेत्रातील अतुलनीय योगदान आणि स्मृती जागृत होतात.
आपल्या उत्कृष्ट अभिनय व अदाकारीने रसिकांच्या मनावर एके काळी हुकमत गाजवाली.त्यांची "पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची" या लावणीने रसिकांच्या मनावर मोठी भुरळ घातली आणि ही लावणी खूपच लोकप्रिय झाली.त्याचबरोबर मुंबईची केळेवाली,रक्तात न्हाली कु-हाड असे अनेक वगनाट्य सादर करुन आपल्या सुंदरते बरोबर आपला गोड गळा,नृत्याविष्कार व उत्कृष्ट अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.
पोटापेक्षा कलेसाठी नाचणाऱ्या विठाबाई गरोदर असतानाही स्टेजवर नाचत होत्या.नाचता नाचता पोटात बाळंतपणाच्या कळा येवू लागल्या.स्टेजच्या मागे असणा-या तंबूत जाऊन विठाबाई यांनी बाळाला जन्म दिला.बाळाची नाळ दगडाने ठेचून त्या पुन्हा स्टेजवर आल्या.आशा लोककलावंत पुन्हा होणार नाही.
भारत चीन युध्दाच्या समयी आपल्या जवांनाना धीर देण्यासाठी,त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सीमेवर जाऊन त्यांचे मनोरंजन करण्याचे मोठे धाडसी कार्य त्यावेळी विठाबाई यांनी केले.त्यांच्या कला क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तमाशा क्षेत्रातील प्रथम पदार्पण करणाऱ्या आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या प्रमाणे विठाबाई यांनी कला क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली.त्या प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर पोहचलेल्या.परंतु शासन दरबारी त्यांचे आजही उपेक्षा होत आहे.
तमाशा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव येथे त्यांच्या भव्य स्मारकाचे स्वप्न अधुरेचआहे. नारायणगाव बस स्थानकाच्या जागेत दहा बाय दहाच्या जागेत त्यांचा पुतळा बसविण्यात आलेला आहे. तमाशा कला रसिक नेहमीच मागणी करतात विठाबाई नारायणगावकर यांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे तसेच त्या स्मारकामध्ये लोककला प्रशिक्षण,लोककलेच्या इतिहासाच्या स्मृती जिवंत करणाऱ्या स्मारकाची निर्मिती केली जावी,असे भव्य दिव्य स्मारक पुढील पिढ्यांना,कला रसिकांना प्रेरणा देईल.
त्यांच्या स्मारकासाठी शासनाने नारायणगाव येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या ताब्यात असलेली २ एकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांचे सुपुत्र कैलास नारायणगावकर यांनी शासनाकडे वेळोवेळी केली आहे.परंतु यासंदर्भात अद्याप कोणतेही दखल घेतली गेली नाही.
कोणतीही ठोस निर्णय झालेली नाही.त्यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त स्मारकासाठी आवश्यक असलेली जागा महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून द्यावी तसेच नारायणगाव येथे भव्य दिव्य स्मारकाची निर्मिती केल्यास तमाशा सम्राज्ञी राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर यांना मानवंदना ठरेल.
शब्दांकन:
नितीनचंद्र भालेराव
-सचिव कला सम्राज्ञी पवळा कला मंच, हिवरगाव पावसा,तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर
फोन नं.९४०५४०४६४३