नाशिक दिनकर गायकवाड पंचवटीतील फुले नगरमध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू असताना मागील भांडणाची विनाकारण कुरापत काढून दोन गटांत तुफाण धुमश्चक्री झाली. यावेळी गोळीबारही करण्यात आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
याप्रकरणी दोन्ही गटांतील युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील काही संशयित रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहीत खंडू गांगुर्डे टोळीतील प्रेम दयानंद महाले, सुमित दयानंद महाले, प्रेम संतोष मिरके तसेच विरोधी विशाल भालेराव टोळीतील विकी विनोद वाघ, ऋषीकेश गणेश परसे उर्फ बाबा,जय संतोष खरात,जय मोरे उर्फ टींगरी तुंड्या जाधव व इतर ८ ते १० यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या हाणामारीचे वृत्त समजताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त संगीता निकम, शेखर देशमुख, पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, फुलेनगर मधील मुंजोबा महाराज मंदिरात भंडारा प्रसाद व जागरण असा धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला होता. या कार्यक्रमा करीता चाळीतील व परिसरातील नागरिक व महिला आले होते.हा कार्यक्रम दरम्यान मुंजोबा महाराजांचे दर्शन व महाप्रसादाचे वाटप रात्री १.३० वाजेपर्यंत सुरू होते.
त्यानंतर मंदिरासमोर जागरणाचा कार्यक्रम सुरू होता व चाळीतील सर्व नागरिक मंदिराच्या आवारात हजर होते.यावेळी भालेराव टोळीतील विकी विनोद वाघ,ऋषीबाबा परसे, जय संतोष खरात, जय मोरे उर्फ टिंगरी, तुंड्या दादू व इतर साथीदारांनी मागील भांडणाचा वाद उकरून काढून जोरजोरात शिवीगाळ करून घरांवर दगडफेक केली.
तसेच काचेच्या बाटल्या फेकल्या.तुफान आरडा ओरडा करून परिसरात दहशत निर्माण केली.तुमचा गेमच करतो,असे सांगून त्याच्या जवळ असलेल्या अग्नीशस्त्राने गोळीबार केल्याने उपस्थित नागरिक भितीने सैरावैरा पळू लागले.लोकांनी भितीपोटी घरे बंद करून घेतली.तसेच जागरणाकरीता जमलेले लोक गल्ली बोळातून भितीने सैरावैरा धावत सुटल्याचे सुमित दयानंद महाले याने पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
