अलिबाग सिटीलाईन न्यूज नेटवर्क अलिबाग येथील शेतकरी कामगार पक्षाचे नेते मा.आमदार जयंत पाटील ह्यांच्या ७०वा. वाढदिवसानिमित्त त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी व पीएनपी नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राज्यातील राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शविली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. प्रसंगी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी येथील पीएनपी नाट्यगृहाचे उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की ज्यांच्या अभिष्टचिंतनासाठी आपण उपस्थित आहोत ते आपल्या सर्वांचे सहकारी जयंत पाटील, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, लोकसभेतील आमचे सहकारी खासदार निलेश लंके, करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील, मा.आमदार बाळाराम पाटील, मा. आमदार बाबासाहेब देशमुख, ज्यांचे विचार आपण ऐकले त्या सुषमा अंधारे, नाट्यगृहाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ज्यांनी विचार मांडले त्या चित्रलेखा पाटील, अन्य सर्व सहकारी आणि बंधू भगिनींनो
आज ह्याठिकाणी दोन कार्यक्रम आहेत. आज या ठिकाणी दोन कार्यक्रम आहेत एक जयंतरावांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि दुसरा ज्या नाट्यक्षेत्राच्या संबंधी त्यांना आस्था आहे त्या नाट्यगृहाचा उद्घाटन सोहळा.मला आठवतंय, एक बातमी माझ्या वाचनात आली की इथल्या नाट्यगृहाला आग लागली. तेव्हा मी तातडीनं जयंतरावांना संपर्क साधला होता. कसं झालं? आता पुढे काय करणार ? आणि त्याबद्दल जयंतरावांना मध्यंतरी खूप अस्वस्थता होती पण आज ती दूर झालेली आहे.
इथली संस्कृती इथला परिसर वैशिष्ट्यपूर्ण आहे.आपल्याला बुद्ध लेणी आणि शिलालेख याचं दर्शन आपल्याला या भागामध्ये होतं. अनेक ऐतिहासिक गोष्टी या भागात घडल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्य स्थापन केलं तो हाच परिसर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला तोही हाच परिसर. शेजारच्या खंदेरी बेटावर मायनाक भंडारी यांनी नौदलाच्या तळावर इंग्रजांचा पराभव केला तोही हाच परिसर. आज या ठिकाणी कान्होजी आंग्रे यांचे वंशज आहेत सरखेल कान्होजी आंग्रे यांनी याच भूमीतून भव्य आरमार उभं केलं आणि पोर्तुगीज व इंग्रजांना शह दिला आणि म्हणून हा सगळा भाग एक प्रकारे ऐतिहासिक भाग आहे. रायगड, अलिबाग, नागाव, चौल, रेवदंडा हे सगळे परिसर ऐतिहासिकदृष्ट्या विशेषतः कोळी संस्कृतीने समृद्ध झालेले आहेत. नागाव एकेकाळी विद्येचं माहेर म्हणून ओळखलं जात होतं म्हणून अनेक गोष्टी इथल्या सांगण्यासारख्या आहेत.
नाट्यगृह आणि कला या क्षेत्रांशी सुसंवाद या भागाचा फार जुना आहे आणि ते जर सांगायचं झालं तर एकेकाळी रायगड जिल्हा हा शक्तीतुऱ्यांचे सामने गाजवणारा म्हणजे ज्याला बाल्या डान्स म्हणतो त्याबद्दलचं वैशिष्ट्य या भागाचं होतं. या भागाने अनेक कलावंत दिले, शाहीर दिले, मराठी रंगभूमीला गायक दिले, कलाकार दिले आणि या नाट्यगृहाला शोभेल अशा प्रकारचे कर्तृत्व दाखवणारे अनेक कलाकार या भागातून गेले आणि त्यांच्यासाठी थिएटरची आवश्यकता होती पण लोकांना शंका होती की पुन्हा नाट्यगृह सुरू होणार की नाही? पण आता आनंदाची गोष्ट ही आहे की थिएटर आता पुन्हा उभं राहिलं आहे. जयंतरावांनी जे कष्ट यासाठी घेतले जे आव्हान स्वीकारलं. त्या कष्टातून पुन्हा एकदा पूर्वीपेक्षा अधिक उत्तम साऊंड सिस्टिम असलेलं, आसन व्यवस्था असलेलं हे थिएटर आज या ठिकाणी पुन्हा उभं राहतंय. याचा मला मनापासून आनंद आहे.
थिएटर उभं करणं आणि त्यानंतर ते थिएटर चालवणं ही काही साधी गोष्ट नाही. ही अत्यंत महागडी गोष्ट आहे. मी स्वतः अशा काही संस्थांशी संबंधित आहे की जिथे थिएटर आहेत. महाराष्ट्र नाट्य संघटनेचं थिएटर असलेलं मुंबईमध्ये यशवंत नाट्यगृहाचा मी अध्यक्ष आहे. नेहरू सेंटर मध्ये जे थिएटर आहे त्याचा अध्यक्ष मी आहे, चव्हाण सेंटर मध्ये थिएटर आहे त्याचा अध्यक्ष मी आहे, आणखी काही थिएटर उभी करण्यामध्ये माझा हातभार आहे. म्हणून मला फार जवळून माहित आहे कि, थिएटर सांभाळणं-चालवणं ही काही साधी गोष्ट नाही.
विशेषतः सार्वजनिक जीवनात जे काम करतात त्यांना आणखी अवघड होतं. आता उदाहरणार्थ या सर्व संस्थेचं नेतृत्व जयंत पाटील करतात. एका कार्यक्रमाचा खर्च, विजेचे बिल, टॅक्सेशन म्हणजे नगरपालिकेचे कर आणि स्टाफ या सगळ्यांचा खर्च हा प्रचंड असतो आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असलेल्या नेतृत्वांकडे जेव्हा थिएटरची मागणी करण्यासाठी लोक जातात त्यावेळेस ते त्यांच्याकडून फुकटच मिळावं अशा प्रकारच्या अपेक्षा करतात आणि अशाच अपेक्षेने जर या थिएटरकडे जाणकारांनी बघितलं तर माझी खात्री आहे त्याची जबरदस्त किंमत जयंतराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना द्यावी लागेल.
म्हणून माझी सूचना असेल की, बाबांनो हे थिएटर चालायचं असेल, अखंड कार्यक्रम व्हायला हवेत तर त्यासाठी कमीत कमी त्याची जेवढी किंमत आहे किमान ती देण्याची तयारी संबंधित घटकांनी मनापासून ठेवली पाहिजे तरच हे थिएटर चांगल्या पद्धतीने आपल्याला सेवा देईल. मला विश्वास आहे की जयंतराव व्यवहारी गृहस्थ आहेत. चुकीच्या गोष्टी होऊ देणाऱ्या नाहीत. जिथे दुरुस्ती करायची आवश्यकता आहे. तिथे दुरुस्ती केल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत आणि त्यामुळे हे थिएटर अलिबाग आणि ह्या परिसरातील जनतेला नाट्यक्षेत्रात असो, कलेच्या क्षेत्रात असो, संगीताच्या क्षेत्रात असो या सर्व क्षेत्रात एक प्रकारचं योगदान देण्याचं काम या माध्यमातून केलं जाईल.
रायगड जिल्हा हा महाराष्ट्रातील एक आगळा वेगळा असा जिल्हा आहे.आज या ठिकाणी येताना आम्हाला लक्षात आलं. राजकारणात काही गोष्टी घडतात पण त्या तशा घडतात म्हणून नाउमेद व्हायचं नसतं.अलिबागला आल्यापासून मी सकाळपासून बघतोय रस्त्याने सुद्धा ठिकठिकाणी लोकांनी थांबवलं आणि तिथे बघितलं की लोकां मध्ये एक जिद्द आहे. पुन्हा एकदा आम्ही 'शेतकरी कामगार पक्ष' इथे उभा करू, मजबूत करू.ही भावना ठिकठिकाणी दिसते. आज या पक्षाला प्रोत्साहित करण्याची भूमिका जयंतराव अतिशय चिकाटीने करत आहेत. कधी कधी मला आठवतं कि जरी माझं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं तरी माझं सगळं घर शेकापवालं.माझ्या घरात माझी आई शेकापची, माझे भाऊ वसंतराव पवार हे शेकापचे जे लोकसभेचे उमेदवार होते, सगळं कुटुंब हे शेकापचं. मी एकटा काँग्रेसवाला. पण आमच्या आईचं म्हणणं होतं तुझी विचारधारा तू तुझ्या पद्धतीने चालव आम्ही सगळे जी विचारधारा मानतोय ते आम्ही आमच्या रस्त्याने जाणार. 'शेतकरी कामगार पक्ष' मी लहानपणापासून माझ्या घरात पाहिलेला आहे. माझ्या घरामध्ये भाऊसाहेब राऊत येत, कधी केशवराव जेधे आलेले आहेत, कधी शंकरराव मोरे आलेले आहेत, कधी नाना पाटील आलेले आहेत, आधी उद्धवराव, एनडी पाटील हे लोक आलेले आहेत. हे मी कुटुंबात अनेक वर्षापासून पाहिलेलं आहे आणि या नेतृत्वांचं वैशिष्ट्य होतं की हे सगळे लोक एका विचाराने, एका तत्वाने आपल्या भूमिकेशी आयुष्यभर प्रामाणिक राहिलेले लोक आहेत. सरकार, सत्ता असो वा नसो याचा विचार त्यांनी कधी केलेला नाही आणि आपल्या विचारांची भूमिका स्पष्ट करत त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. जो कष्टकरी वर्ग आहे त्याच्या हिताची जपणूक त्यांनी केली. आज पुन्हा एकदा चिकाटीने हा विचार पुढे न्यायचा विचार जयंतराव करतात याचा मला मनापासून आनंद आहे.
माझी खात्री आहे त्यांच्या कष्टाला तुम्हा सगळ्यांची साथ मिळेल.मी त्यांना एवढेच सांगतो की महाराष्ट्राचं चित्र बदलायचं आहे.महाराष्ट्र जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा राज्य आहे असं आपण म्हणतो पण आज ज्यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रं आहेत त्यांना जोतिबा फुले यांच्याबद्दल, शाहू महाराजांच्या संदर्भात, बाबासाहेब आंबेडकरांबाबत अंत:करणापासून किती आस्था आहे याबद्दलची शंका वाटावी अशा प्रकारचं चित्र आहे. सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्राचं समाजकारण योग्य मार्गावर पुनर्स्थापित करायचं असेल तर प्रागतिक विचाराच्या लोकांना बाकीचे मतभेद सोडून एकत्र यावं लागेल आणि आम्हा लोकांची भूमिका हीच राहील की काहीही झालं तरी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांना शक्ती द्यायची आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, डावे पक्ष असतील, राष्ट्रवादी पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष असतील या सगळ्यांना संघटित करून एकत्रित एकमेकांना सहकार्य करून पुन्हा एकदा महाराष्ट्राचा सामाजिक आणि राजकीय स्तर बदलण्याची भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागेल आणि तो विचार आम्ही लोकांनी मनापासून ठेवलेला आहे. त्यासाठी जी काही ठिकाणं महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाची आहेत त्यामध्ये रायगडकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
सबंध रायगडचा इतिहास बघितला तर जुन्या काळामध्ये किती मोठी माणसं होऊन गेली होती भाऊसाहेब राऊत असतील, डी बी पाटील असतील, प्रभाकर पाटील असतील ते आता जयंतरावांपर्यंत. अनेक लोक राज्य पातळीवर शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा विचार मांडू शकले आणि संघटन उभे करू शकले अशा माणसांची एक प्रचंड यादी देता येईल इतकी कर्तुत्वाची आणि नेतृत्वाची फळी या जिल्ह्याने महाराष्ट्राला दिलेली आहे आणि हा इतिहास विसरून चालणार नाही आणि त्यासाठी मी एवढेच सांगू इच्छितो, विशेषतः या जिल्ह्यातील नव्या पिढीने प्रागतिक विचारांचा वारसा, परंपरा आणि इतिहास ह्याचं स्मरण ठेवणं, जतन करणं आणि वाढवणं यात अधिक कष्ट करण्याची आज गरज आहे.
आम्ही सगळेजण या कामात तुमच्या मागे उभे राहू. त्यात कसलाही राजकीय स्वार्थ नाही. फक्त विचार जतन केला पाहिजे, तो शक्तिशाली केला पाहिजे आणि त्या विचाराच्या माध्यमातून कष्टकरी मग तो शेतकरी असेल, तो कामगार असेल त्याच्या हिताची जपणूक करणे हेच सूत्र घेऊन आज महाराष्ट्रात काम करायचा आहे आणि त्यासाठी रायगड जिल्हा अलिबाग हा परिसर हा अत्यंत महत्त्वाचा घटक राहील आहे याची मला खात्री आहे. जयंतराव तुम्ही काम करत रहा. आमच्या सगळ्यांची साथ तुम्हाला कायम मिळेल ही खात्री या ठिकाणी देतो. मला आश्चर्य वाटलं की, जयंतरावांचा ७० वा वाढदिवस आहे. कारण त्यांच्याकडे बघितल्यानंतर ते सत्तरीला पोहोचलेत असं काही वाटत नाही अजूनही त्यांचा उत्साह ३५-४० वर्षाच्या तरुणांइतका आहे. मी पाहतोय तेव्हापासून ते आहे तसेच आहेत. त्यांच्या स्वभावात काही फरक नाही, त्यांच्या संस्था चालवण्यामध्ये काही फरक नाही. कुठलंही काम हातात घेतलं की ते नीट-नेटकंच करायचं ही भूमिका त्यांनी आतापर्यंत जाणीवपूर्वक जतन केलेली आहे.
महाराष्ट्रातल्या अनेक सहकारी संस्थांशी माझा संबंध येतो. आज महाराष्ट्रामध्ये दोन-तीन जिल्हे असे आहेत. सिंधुदुर्ग म्हणता येईल, रत्नागिरी म्हणता येईल, रायगड किंवा ठाणे जिल्हा म्हणता येईल या जिल्ह्यांमध्ये सहकारी बँकांचे जाळं शक्तिशाली आहे. या बँकांची स्थिती आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे. या जिल्ह्यामध्ये घेतलेलं कर्ज परत करण्याची प्रवृत्ती असते. सर्व बँकांची यादी काढली तर समजेल ९०% च्या वर रिकवरी घेणाऱ्या कोणत्या बँका आहेत तर त्यात रायगड जिल्ह्याचा उल्लेख हा करावा लागतो, सिंधुदुर्गचा करावा लागतो, रत्नागिरीचा करावा लागतो. मी अनेकदा विचार करतो नेमक्या या चार जिल्ह्यातच असं का आहे? याचा अर्थ कोकणी माणसाच्या स्वभावात दिसतो असं मला वाटतं. घेतलेलं कर्ज लवकरात लवकर फेडणे याशिवाय गत्यंतर नाही. हा विचार कोकणी माणसाच्या अंतकरणात रुजलेला आहे.आता मी ज्या जिल्ह्यातून येतो. आमच्या सगळ्या भागांमध्ये बँका मोठे आहेत पण थकबाकी ही मोठी आहे. घेतलेला पैसा हा दिलाच पाहिजे याची चिंता नसते. वसुलीचा तगादा आल्यानंतर वसुली होते. पण रायगड जिल्हा असेल किंवा सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरीमध्ये प्रवृत्ती वेगळी आहे. घेतलेला पैसा लवकर देऊन टाका पुढच्या कुणाच्या डोक्यावर ओझं नको. उद्या ओझं ठेवून गेलो तर कावळा शिवणार नाही आणि त्यामुळे लवकर देऊन टाकू ही प्रवृत्ती या ठिकाणी आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्हा बँक ही अत्यंत महत्त्वाची यशस्वी बँक आहे. त्यामध्ये इथलं व्यवस्थापन जसं महत्त्वाचं आहे तसंच या सहकाराचा लाभ घेणारा सर्वसामान्य कोकणी माणूस आणि त्याचा दृष्टिकोन हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे.
