नाशिक दिनकर गायकवाड पिंपळगाव आगारातून सोडण्यात येणाऱ्या वणी-पिंपळगाव बसवंत बसफेऱ्या वाढवण्यात याव्यात, अशी मागणी वणी शहर भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
पिंपळगाव बसवंत येथे शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी वणी,मावडी, बोराळे,तिसगाव, तळेगाव, सोनजांब, खेडगाव व जऊळके आदी भागातून मोठ्या प्रमाणावर जात असतात. या विद्यार्थ्यांची परत येण्याची वेळ दुपारी तीन ते पाच असल्याने या कालावधीत पुरेशा एस. टी. बसेस नाहीत.
याचवेळेस ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग तसेच रोज प्रवास करणारे प्रवासी यांची परतीची वेळदेखील याच वेळेस असल्याने बसमध्ये प्रवास करण्यासाठी मोठी गर्दी होते. याचा त्रास सर्व प्रवाशांना होतो. पाच वाजेच्या बसमध्ये प्रवासी व विद्यार्थ्यांची संख्या १०० ते १२० असल्याचे सांगितले जाते. इतक्या मोठ्या संख्येने प्रवासीवर्ग असल्याने अतिरिक्त बसची व्यवस्था करावी, अशी मागणी भाजप पदाधिकारी महेश कावळे व माजी मंडळ अध्यक्ष किरण तिवारी यांनी पिंपळगाव आगाराचे वाहतूक निरीक्षक योगिता बेंडसे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन नरहरी झिरवाळ तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व खा. भास्कर भगरे यांनादेखील देण्यात आले आहे.
बस प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बस फेऱ्या वाढवा
प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पर्याप्त वाहतुकीची व्यवस्था करावी. शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक व खियांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त बसेस उपलब्ध करून द्याव्यात.
दर्शन दायमा, माजी संघटन सरचिटणीस, भाजप
प्रवाशांचा प्रवास सुरक्षित
-प्रवाशांना सुखद व सुखकर प्रवासी सेवा देण्याचा राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा प्रयत्न असतो. बसच्या फेऱ्या वाढवण्याबाबत वरिष्ठांकडे चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
योगिता बेंडसे, वाहतूक निरीक्षक, पिंपळगाव आगार
