५ लाखांच्या कर्जावर ३० लाख रूपये व्याज घेऊनही महिला सावकाराची महिलेला कोंडून अमानुष मारहाण
नाशिक दिनकर गायकवाड ५ लाख रुपयांच्या कर्जावर ३० लाख रुपये व्याज देऊनही महिला सावकराने दोघांच्या मदतीने महिलेला कोंडून अमानुषपणे मारहाण केल्याची घटना नाशिक रोडच्या शिखरेवाडी परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की पीडित फिर्यादी महिला आणि खासगी सावकार आरोपी सारिका अशोक किर (वय ४५) यांची दहा वर्षांपासून जुनी ओळख आहे. कौटुंबिक किंवा आर्थिक अडचण आल्यास पीडित महिला नेहमी किर यांच्याकडून व्याजाने रक्कम घेत होत्या. सन २०१८ मध्ये पीडितेला आर्थिक अडचण आल्याने त्यांनी सारिका किर हिच्या कडून पाच लाख रुपये मासिक पाच टक्के व्याजदराने घेतले होते. पीडित महिला करीत असलेल्या व्यवसायाच्या उत्पन्नातून न चुकता सारिका किरला दर महिन्याला २५ हजार रुपये व्याजाची रक्कम म्हणून देत होत्या. व्याजाची रक्कम देण्यास कधी उशीर झाला, तर सारिका किर त्यांना मारहाण करून अश्लील शिवीगाळ करीत होती. वेळेवर पैसे न दिल्यास "तुझ्या मुलाला व मुलीला गायब करून टाकीन," अशी धमकी देत होती. डिसेंबर २०२२ पासून सारिक किरने दहा टक्क्यांप्रमाणे व्याज घेण्यास सुरुवात करून दरमहा ५० हजार रुपये व्याज द्यावे लागेल, असे सांगितले. सारिका किर हिच्या धमकीला घाबरून पीडित महिला मुलांच्या नोकरीतून, तसेच स्वतःच्या व्यवसायाच्या उत्पन्नातून येणारे येणारे पैसे किरला देत होत्या. डिसेंबर २०२३ मध्ये पीडितेकडून काही कारणास्तव काही महिन्यांची व्याजाची रक्कम थकली होती.
त्यावेळी सुद्धा सारिका किरने पीडितेला घरी बोलावून शिवीगाळ करीत मारहाण करीत येथून पुढे पैसे थकविले, तर तुझ्या मुलीला वेश्याव्यवसायात टाकू, अशी धमकी दिली. पीडितेने पुन्हा घाबरून त्यांच्या ओळखीच्या महिलेकडून पाच तोळ्यांची पोत घेत सारिका किरकडे गहाण ठेवून दीड लाख रुपये व्याजाची रक्कम वळती केली. त्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये कौटुंबिक अडचणींमुळे व्याजाची रक्कम पुन्हा थकली. त्यावेळी सारिका किर व तिचा मुलगा अमन यांनी लाकडी दांड्याने अमानुषपणे मारहाण करून शिवीगाळ केली. त्यावेळी अमनने स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असा स्पर्श तिला केला. हा सर्व प्रकार पीडितेने पती व मुलांना सांगितला; परंतु किरने दिलेल्या धमकीला घाबरून पीडिता पोलिसांकडे तक्रार करीत नव्हती. किरच्या त्रासाला कंटाळून पीडितेने घर सोडून देत दुसरीकडे राहण्यास सुरुवात केली. सारिका किर नेहमी पीडितेला फोनवर धमक्या देऊन घराचा पत्ता विचारीत होती. तिने पैशाचा तगादा लावल्यामुळे दि. २ जून रोजी फोन पेद्वारे अमन किरच्या नंबरवर दहा हजार रुपये पाठविले, तसेच व्याजाचे पैसे दिले नाहीत म्हणून पीडितेचे ३० हजार रुपये किमतीचे वॉशिंग मशीन, १ लाख २५ हजार रुपये किमतीची दुचाकी, ५० हजार रुपये किमतीचा सोन्याचा गणपती व ९० हजार
रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या अशा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांच्या वस्तू तिने जबरदस्तीने घेऊन टाकल्या. किरचे पैसे फेडण्यासाठी पीडितेने घर गहाण ठेवून दोन लाख रुपये, तर पतीच्या भविष्यनिर्वाह निधीतून साडेतीन लाख रुपये दिले. दि. २९ जुलै रोजी सारिका किर, तिचा मुलगा अमन किर व खान नावाची व्यक्ती हे तिघे पीडितेच्या घरी आले. पीडिता घरी एकटी असताना तिघांनी तिला अमानुष मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच मुलाने व खान नावाच्या व्यक्तीने तिचा विनयभंग
केला. यावेळी पीडितेच्या मुलाने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी तिघे तिच्या घरी उपस्थित होते. त्यांनी पोलिसांशीसुद्धा अरेरावीची भाषा वापरीत "माझे पैसे घेणे आहेत," असे सांगितले.
अशा प्रकारे आरोपींनी पाच व दहा टक्के व्याजदराने जबरीने फिर्यादी महिलेकडून ३० लाख रुपये व्याजाचे पैसे व पाच तोळ्यांचे अंदाजे पाच लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र अशा प्रकारे ३८ लाख ४५ हजार रुपये जबरीने वसूल करून घेतले.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खासगी सावकार मायलेकासह अन्य एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दाभाडे करीत आहेत.