नाशिक दिनकर गायकवाड लासलगाव पोलीस व पत्रकार उमेश पारीख यांच्या सतर्कतेने एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र बळजबरीने हिसकावुन जबरी चोरी करणाऱ्या दोन महिलांपैकी एका महिलला पोलिसांनी अटक केली असून, दुसऱ्या महिलेचा शोध सुरु आहे.
येथील सुकेणकर चाळ, बाजारतळ येथे राहणाऱ्या इंदुमती दत्तात्रय काळे (वय ७५) या घरात एकट्या असल्याचा फायदा घेवून दोन महिलांनी त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांना केळी खा असे कारण सांगून त्यांनी नकार देताच या महिलांपैकी एका महिलेने बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवून दुसऱ्या महिलेने इंदुमती काळे यांच्याशी झटापटी करुन त्यांच्या गळ्यात असलेली सोन्याचे डोरले ५ सोन्याचे मणी असलेली काळ्या मणीत ओवलेली ३ ग्रॅम वजनाची २८ हजार रुपये किंमतीची पोत गळ्यातून बळजबरीने हिसकावून घराबाहेर पळाल्या.
इंदुबाई यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे पत्रकार उमेश पारीख यांना समजल्याने त्यांनी लागलीच या घटनेबाबत लासलगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यांनी उपनिरीक्षक सांळुखे, पो. हवा. निचळ, पो. हवा.गोसावी, म. पो. हवा कदम, तळेकर यांना महिला आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या.उमेश पारीख यांच्या मदतीने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने चोरी करणाऱ्या महिलांपैकी एक महिला छाया आकाश कुऱ्हाडे (रा. सुमतीनगर, लासलगाव) हिला ताब्यात घेतले. पळून गेलेली दुसरी महिला ही तिची बहिण असून तिचे नाव पूजा प्रविण कुन्हाडे (रा. सुमतीनगर) असल्याचे समजले.
वृद्ध महिला इंदुमती काळे यांचा मुलगा राजेंद्र काळे (रा. भाऊसाहेबनगर, निफाड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लासलगाव पोलीस ठाण्यात आरोपी महिला छाया आकाश कुन्हाडे, पूजा प्रविण कुन्हाडे (दोन्ही रा. सुमतीनगर, लासलगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाया आकाश कुन्हाडे हिला अटक करण्यात आली असून, पोलीस फरार महिला आरोपी पूजा कुन्हाडे हिचा शोध घेत आहे.