नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील वनारे-खुंटीचा पाडा पिंपळपाडा या रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली असून पायी चालणे सुध्दा जिकीरीचे झाले आहे. त्यामुळे त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी त्रस्त जनतेकडून होत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून वनारे- खुंटीचापाडा पिंपळपाडा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर चिखल, खड्डे आणि साचलेले पाण्याचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे वाहने सोडाच तर पायी चालणे सुध्दा मुश्किल झाले आहे. या भागातील नागरिकांना पावसाळ्यात दळणवळणासाठी अत्यंत गंभीर संकट भेडसावत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाणे, शेतकऱ्यांना शेतामालाची वाहतूक करणे, गर्भवती महिला व रुग्णांना दवाखान्यात वेळेत पोहोचता येत नाही.
दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त होत आहेत. पायवाट करून जाणाऱ्यांना चिखलात अडकण्याची वेळ येते. एकीकडे देश डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी याकडे वाटचाल करत असताना, दुसरीकडे अजूनही अनेक ग्रामीण भागांत रस्त्यांची ही अवस्था दुर्दैवाने कायम आहे. हा रस्ता अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग
आहे. परंतू या रस्त्याच्या विकासाकडे कोणत्याही प्रशासनाकडून लक्ष दिले नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे केवळ आश्वासनांपुरतेच लक्ष दिले आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदने दिली परंतू लेखी तक्रारी केल्या. जनप्रतिनिधींना भेट
दिली, तरीही प्रत्यक्ष काम मात्र शून्य. विकासाच्या नावाखाली खर्ची पडणाऱ्या कोट्यवधींच्या योजना येथे के वळ कागदांपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागातील नागरिकांना दरवर्षी हा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी याआधी अनेक वेळा श्रमदान करून तात्पुरते मार्ग मोकळे केले. रस्त्याला खडी टाकली, परंतु सततच्या पावसामुळे ही कामे काही दिवसांतच अपुरी ठरतात. रस्त्याचे डांबरीकरण, जलनिकासीची योग्य व्यवस्था, वळणांची सुधारणा आणि नियमित देखभाल या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. परंतू कोणतेच विभाग याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
