नाशिक दिनकर गायकवाड बंद घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक विविध हत्यारांच्या सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून साडेतीन तोळे सोन्याचे व एक किलो चांदीचे दागिने असा एकूण साडेदहा लाखांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना चार्वाक चौकात नुकतीच घडली.
घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी राजेंद्र भास्कर भाटे (रा. शक्तीधाम अपार्टमेंट, चार्वाक चौकाजवळ, इंदिरानगर) हे २१ ते ३० जुलै दरम्यान कल्याण येथे गेले होते. दि.३० जुलै रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या कुटुंबीयांनी त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याचे कळविले.भाटे दाम्पत्य
त्वरित नाशिकला त्यांच्या घरी पोहोचले. तेव्हा त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडलेले दिसल्याने त्यांनी घरामध्ये पाहिले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कपाटाचे लॉक तोडून सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले. लोखंडी कपाटात असलेले ७ लाख ७० हजार किमतीचे २२ तोळ्यांचे सोन्याचे बिस्कीट, ६० हजार रुपये किमतीची दोन तोळ्यांची सोन्याची चेन, ३० हजारांचे दीड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट, एक लाख रुपये किमतीच्या चार तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, सात हजार रुपये किमतीच्या तीन ग्रॅम वजनाच्या कानातील रिंगा, १५ हजार रुपये किमतीच्या सहा ग्रॅम वजनाच्या कानातील रिंगा, २५ हजार रुपये किमतीचे ४५० ग्रॅम वजनाचे चांदीचे ताम्हण, ५ हजार रुपये
किमतीचा १०० ग्रॅम वजनाचा चांदीचा ग्लास, १४ हजार रुपये किमतीचा २५० ग्रॅम वजनाचा चांदीचा तांब्या, १२ हजार रुपये किमतीचे दोनशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दोन ग्लास, ८ हजार ५०० रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे चांदीचे दहा कॉईन, तीन हजार रुपये किमतीचा ५० ग्रॅम वजनाचा चांदीचा एक कॉईन, १२०० रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाची चांदीची पळी व सात हजार रुपये किमतीचे २५ ग्रॅम वजनाचे पाच नग चांदीचे निरांजन असा एकूण १० लाख ५७ हजार ७०० रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फुंदे करीत आहेत.