पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशन,महाराष्ट्राच्या वतीने नुकतेच पुणे येथे राज्य कार्यकारिणीचे अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसांच्या अभ्यासवर्गात पक्षाची राजकीय दिशा, कार्यकर्त्यांचे वैचारिक भान, संघटनात्मक बांधणीची प्रक्रिया, सोशल मीडियाचा परिणामकारक वापर आणि वर्तमान राजकीय- सामाजिक परिस्थितीतील आव्हाने या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या अभ्यासवर्गासाठी मार्गदर्शन करण्यासाठी भाकप मालेचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉ.रामजी राय, केंद्रीय समिती सदस्य सुचेता डे, कॉ. लेखा तसेच महाराष्ट्राचे पक्षप्रभारी कॉ. प्रभात हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून पक्षाच्या ऐतिहासिक भूमिका, वर्तमानकाळातील कार्यकर्त्यांपुढील जबाबदाऱ्या आणि संघटन विस्तारासाठी आवश्यक असलेल्या रणनीती याबाबत स्पष्ट मार्गदर्शन केले.
या अभ्यासवर्गामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून राज्य कार्यकारिणी सदस्य उत्साहाने सहभागी झाले. चर्चासत्रे, गटचर्चा आणि अनुभवांची देवाणघेवाण यामुळे अभ्यासवर्ग अधिक समृद्ध झाला. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी एकमताने ठरविले की पक्षाच्या कार्यक्रमाला व्यापक जनाधार मिळवून देण्यासाठी तळागाळातील चळवळींमध्ये सक्रीय सहभाग आवश्यक आहे.
