नाशिक दिनकर गायकवाड आगामी सण-उत्सव व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारांविरुद्ध कडक पावले उचलण्यात येणार आहे. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दोन गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऋतिक ऊर्फ गजाळ्या वसंत रक्ताटे (वय २३, रा. पाटीलनगर, सिडको) याच्यावर गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करणे, गंभीर दुखापत करणे, घरात घुसून धमकी देणे, मालमत्तेचे नुकसान करणे व मनाई आदेशाचे उल्लंघन करणे यांचा समावेश आहे. त्याला दोन वर्षांसाठी नाशिक शहर व जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमराव ऊर्फ लखन सुधाकर डांगळे (वय ४०, रा. जुनी स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प) याच्यावर साथीदारांसह
बेकायदेशीर जमाव करून हत्याराचा धाक दाखवून मारहाण करणे, गंभीर दुखापत करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, तसेच अवैध दारू विक्री यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एक वर्षाची तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
या दोघांविरुद्धची कारवाई ३१ जुलै २०२५ रोजी करण्यात आली असून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार आगामी सण-उत्सव व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारांविरुद्ध कडक पावले उचलण्यात येणार आहे.
हद्दपार गुन्हेगार नाशिक शहर किंवा जिल्ह्यात दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, तसेच अशा गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांनी सामाजिक आणि नैतिक जबाबदारीचे भान ठेवून वर्तनात सुधारणा करावी, अन्यथा त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन परिमंडळ-२ चे उपायुक्त किशोर काळे यांनी केले आहे.