नाशिक दिनकर गायकवाड इस्त्तरीवाल्याला संमोहित करून एका भोंदू नागा साधूने ५२ हजारांची फसवणूक केल्याची घटना नाशिकच्या जेलरोड परिसरात घडली.
घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की नुकतेच दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास चार इसम एका कारमध्ये फिर्यादी विजय रामचंद्र परदेशी (वय ५५) यांच्या कोयना कॉलनीतील घरासमोर आले. त्यावेळी गाडीतून एक युवक उतरला आणि परदेशी यांना म्हणाला,की महाराज आलेले आहेत.
ते तुम्हाला बोलावत आहेत.त्यावेळी परदेशी आपल्या घराबाहेर आले. त्यांनी कारमध्ये पाहिले असता नागा साधूसारखे दिसत असलेला एक इसम गाडीत बसलेला होता.तो परदेशी यांना म्हणाला, "क्या काम करते हो?" तेव्हा परदेशी यांनी इस्तरीचा व्यवसाय करीत असल्याचे सांगितले.
तेव्हा भोंदू साधू त्यांना म्हणाला, "आशीर्वाद लोगे या धन ?” तेव्हा परदेशी यांनी आशीर्वादही लूँगा । धन का क्या करना है,"असे उत्तर दिले. या भोंदू बाबाने बोलण्याच्या नादात नंतर परदेशी यांना संमोहित करून त्यांच्या हातातील दहा ग्रॅम वजनाची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व खिशात असलेले १२ हजार रुपये रोख काढून ते जेलरोडच्या दिशेने निघून गेले. या प्रकरणी चौघा अनोळखी इसमांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
