-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा.व गिरीश महाजन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
श्रीरामपूर दिपक कदम सदगुरु संत गंगागिरी महाराजांच्या अध्यात्मिक परंपरेचा वारसा लाभलेल्या या भागासह चाळीस क्रोशीतील भाविकांच्या विकासासाठी वैजापूर तालुक्यातील देवगाव शनि येथील उच्च पातळी बंधारा बांधकाम व सरला बेट विकास आराख़ड्याला मंजूरी तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल,दुष्काळग्रस्त मराठवाड्याला न्याय दिला जाईल,असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत लोकसभा निवडणूकित आमच्या विरोधात ‘व्होट जिहाद’चा प्रयोग झाला, काही मूठभर लोकांनी राष्ट्रीय व अध्यात्मिक विचार संपवण्याचा विडाच उचलला होता. ही मंडळी संतांच्या विचारांनाही नष्ट करू पाहत होती. मात्र आमच्यासाठी संतशक्ती मैदानात उतरल्यामुळे विजय मिळाला. सरकार येते, जाते,खुर्ची आज आहे उद्या नसेल, परंतु देश व धर्म कायम राहिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
देवगाव शनि (तालुका वैजापूर) येथे सदगुरु संत गंगागिरी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाची सांगता बंद रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार रमेश बोरनारे,आमदार विठ्ठल लंघे, सुरेश चव्हाणके, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच अन्य अध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईतून येतांना समुद्राचे दर्शन होते, त्याप्रमाणे इथे आल्यावर भाविकांच्या सागराचे दर्शन झाले. १७८ वर्षांची परंपरा असलेला हा अध्यात्मिक सोहळा, भाविकांची शिस्त, तत्परता, भाविकता हे सगळं मनाला विलक्षण आनंद देणारे आहे. देशहिताच्या विचाराला मारक असणाऱ्या शक्ती उदयास येतात, तेव्हा हे सांस्कृतिक आक्रमण थोपविण्यासाठी संत शक्ती मैदानात उतरते. संतांच्या विचारांचे महत्त्व त्याचमुळे अबाधित आहे. याच विचारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रयतेचे स्वराज्य मिळविले. अध्यात्माच्या शक्तीमुळे सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि मणाला सकारात्मक कार्याची प्रेरणा मिळते, आध्यात्मिक शक्ती सुविचार देते, राष्ट्रभावना जागवते. आपल्याला जातीभेद विसरून एकसंघ व्हावे लागेल. देश, धर्म, आणि परंपरा टिकवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. काही लोक समाजाला फोडण्याचे प्रयत्न करत आहे, अशांना उत्तर देण्यासाठी संत विचारांची मशाल महत्वाची ठरेल. सरला बेटाचा विकासासाठी १०९ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा लवकरच कार्यान्वित करण्यासाठी मान्यता देण्यात येईल. तसेच देवगाव शनि येथील उच्च पातळी बंधाऱ्याची मागणीही लवकरच पूर्ण करु, असे आश्वासन दिले. ज्यांनी आम्हाला निवडून दिलं, त्या लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांना कधीच पश्चाताप होणार नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, दुष्काळग्रस्त मराठवाड्याला न्याय दिला जाईल.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, याभागातील अध्यात्मिक चळवळ ही आम्हा सगळ्यांना मार्गदर्शक आहे. २००० साली लोणीचा सप्ताह स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या हरिनाम सप्ताहा पेक्षाही शनिदेव गाव येथील सप्ताह मोठा झाला, अशी कबुली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.