-पोलीस आयुक्तालयाचे कार्य कौतुकास्पद आमदार सरोज अहिरे
-सरदार चौक मित्र मंडळ, श्री प्रतिष्ठान मित्र मंडळ प्रथम क्रमांकाचे मानकरी
नाशिक दिनकर गायकवाड पोलीस आयुक्तांनी सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्कृष्ट मंडळांना पुरस्कार देण्याची कल्पना सुरू केलेली अतिशय कौतुकास्पद व वाखाणण्याजोगी आहे.त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना चांगले करण्याकरिता प्रोत्साहन मिळत असून पोलिसांकडून सन्मान म्हणजे मानाचे लक्षण असल्याचे मत आमदार सरोज अहिरे यांनी व्यक्त केले.नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ मधील उत्कृस्ट देखावे सादर करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना वृश्चिक देणार संदर्भात आयोजित केलेला वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.गंगापूर रोडवरील नाशिक पोलीस आयुक्तालयात आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी जलज शर्मा होते.
या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आदर्श गणेश मंडळांपैकी परिमंडळ १ मधील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सरदार चौक मित्र मंडळ, पंचवटी, तर परिमंडळ २ मधील प्रथम क्रमांक वडाळा-पाथर्डी रोड येथील श्री प्रतिष्ठान मित्र मंडळाला विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या हस्ते देण्यात आला. परिमंडळ १ मधील द्वितीय क्रमांक जुनी तांबट लेन,भद्रकाली येथील श्री राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा मित्र मंडळाला, तृतीय पुरस्कार राजपाल कॉलनी, पंचवटी येथील विघ्नहर्ता मित्र मंडळास तर उत्तेजनार्थ पुरस्कार पंचवटीतील न्यू स्फूर्ती लोणार लेन मित्र मंडळ आणि टिळक पथ येथील सार्वजनिक वाचनालयाला विभागून देण्यात आला. परिमंडळ २ मधील द्वितीय क्रमांक नाशिकरोड येथील
आयएसपी सीएनपी वेल्फेअर फंड कमिटीला,तृतीय क्रमांक सातपूर येथील अमर ज्योत मित्र मंडळ व उपनगर येथील कपालेश्वरचा राजा मित्र मंडळ यांना विभागून देण्यात आला. तर उत्तेजनार्थ आदर्श मंडळ पुरस्कार सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समिती व देवळाली येथील शिवयुवा प्रतिष्ठान सामाजिक संस्थेला
विभागून देण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून आदर्श मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संयुक्तरीत्या हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारले.
या प्रसंगी स्वागत आणि प्रास्ताविक करताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक ड्रग्ज मुक्त करण्यासाठी जागृती आवश्यक असून मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्याकरिता सहकार्य करण्याचे आवाहन केले. गणेशोत्सव यासारखे सार्वजनिक कार्यक्रम साजरे करीत असताना कार्यकर्त्यांना व नव्या पिढीला काहीतरी चांगले आणि वेगळे करण्याकरिता प्रोत्साहन मिळावे, यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात असल्याचे ते म्हणाले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळीपोलीस आयुक्तालयातर्फे आदर्श गणेश मंडळांना जलज शर्मा तसेच पुरस्कार प्राप्त सरदार चौक मित्र मंडळ मंडळाचे महेश महंकाळे व श्री प्रतिष्ठान मित्र मंडळाचे ॲड.शाम बडोदे यांनी व परीक्षक समितीच्या वतीने आर. डी. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आदर्श गणेश मंडळ निवड समितीचे सिताराम कोल्हे, शेखर देशमुख, प्रा. अशोक सोनवणे, डॉ. सचिन बारी, सौरभबेंडाळे, अजित निकत, आर. जे. पवार, बाळकृष्ण चव्हाण, सुनील शिरसाठ, राकेश हांडे, केशव मोरे, सुनील कासर्ले, जगदीश डिंगे, निशिकांत पाटील, राजेंद्र पवार आदींचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉ. तुषार पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आभार मानले. यावेळी नाशिक शहर परिसरातील पुरस्कार प्राप्त सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कुटुंबीय तसेच पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, किशोर काळे, चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे शाखा प्रभारी, अधिकारी, अंमलदार, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
