रिपाइंचे प्रशासनाला निवेदन
श्रीरामपूर दिपक कदम तालुक्यातील ख्रिस्ती धर्मीयांसह सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या हरेगाव येथील मत माऊली यात्रेच्या पार्श्वभूमीवर १३ सप्टेंबर रोजी हरेगाव येथे भरणाऱ्या यात्रेमध्ये विक्री होणाऱ्या केमिकल युक्त पेढ्या विरोधात रिपब्लिकन पक्ष पॅरिस कौन्सिल वतीने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना याबाबत निवेदन देत,यात्रेच्या ठिकाणी प्रसाद म्हणून विकले जाणारे पेढे खव्याचे नसून केमिकलयुक्त असल्याचा गंभीर आरोप केला.
दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की,या केमिकलयुक्त पेढ्यांमुळे भाविकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात.मागील वर्षी अनेक भाविकांना पेढे खाल्ल्यानंतर त्रास जाणवला होता. त्यामुळे यंदा अन्न प्रशासन व पोलीस प्रशासनाने योग्य ती तपासणी करून अशा पेढ्यांची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी,अशी जोरदार मागणी करण्यात आली.
जर प्रशासनाने वेळेवर योग्य पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही त्रिभुवन यांनी दिला.या वेळी उपस्थित प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते:मा.नगरसेवक प्रकाश ढोकणे, पॅरिस कौन्सिलचे अध्यक्ष कमलाकर पंडित,लकी शेठी, सुरेश ठुबे, सुनील सोनवणे, विलास बनसोडे, विजय त्रिभुवन, दीपक कदम शरद पंडित, मनोज कुमार गायकवाड,राजेंद्र त्रिभुवन, प्रतीक गायकवाड,सुवर्णा बोधक, प्रतिभा पंडित,संगीता पंडित, लता बनसोडे,त्रिभुवन विना दुशिंग आदींची उपस्थिती होती.
मतमाऊली यात्रेत लाखो भाविकांचा सहभाग असतो. त्याच्या आरोग्याची जबाबदारी प्रशासनावर आहे.त्यामुळे केमिकलयुक्त पेढ्यांची विक्री थांबवून भाविकांना सुरक्षित प्रसाद मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रशासन काय पावले उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
