आश्वी संजय गायकवाड मी अकोले तालुक्यातील आदिवासी पाड्यात जन्मलो.चिकाटी व संयमाच्या जोरावर आयएएस परीक्षा पास केली, जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद व महानगरपालिकेत जबाबदाऱ्या सांभाळल्या. पण खऱ्या अर्थाने समाजसेवेची खरी संधी मला रयत शिक्षण संस्थेत मिळाली. लोकनेते शरद पवार यांच्या प्रेरणेने आज मी संस्थेचा भाग झालो आहे,” अशा भावूक शब्दांत रयत शिक्षण संस्थेचे सचिव व मा. सनदी अधिकारी विकास देशमुख यांनी आपला जीवनप्रवास नुकताच मांडला.
रयत शिक्षण संस्थेच्या संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील इंग्लिश स्कूल व महाविद्यालयात आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंती सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सचिव विकास देशमुख बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की, रयत शिक्षण संस्था आज १६ जिल्ह्यांत व कर्नाटकात एकूण ७४२ शाखांमधून ६ लाख २० हजार विद्यार्थ्यांना १५ हजार कर्मचारी शिक्षण देत आहेत. हा प्रवास म्हणजे गरीबांच्या स्वप्नांना पंख देणारा आणि कर्मवीरांच्या बहुजन उद्धारक दूरदृष्टीचे द्योतक असून समाजपरिवर्तनाचा इतिहास आहे.
यावेळी विभागीय अधिकारी बाळासाहेब नाईकवाडी,प्रमोद तोरणे, प्राचार्य देवराम वडितके, पर्यवेक्षक दिपक चव्हाण, बाळकृष्ण होडगर, सुभाष म्हसे,अँड अशोक बोरा, सुमतीलाल गांधी, सुशील भंडारी, बाळासाहेब गायकवाड,राहुल जऱ्हाड, गोरक्षनाथ बनकर,सेवा निवृत्त प्राचार्य गमे,सरपंच नामदेव शिंदे,वैभव ताजणे अनिल मुंन्तोडे,शिक्षक रमेश थेटे, अनिता गाडे, सुवर्णा वाकचौरे, मोहन घिगे, राजेंद्र बर्डे, वैशाली सोसे, उषा घिगे, हरिभाऊ कोकाटे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पत्रकार वैभव ताजणे यांनी “गोरगरीब विद्यार्थ्यांना लहानपणापासून दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून इंग्रजी माध्यमाची ज्युनियर व सीनियर केजी सुरू करावी” अशी मागणी केली. देशमुख यांनी त्याचे स्वागत करत ठराव संस्थेकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
-शाळेची सद्यस्थिती समाधानकारक
सध्या आश्वी इंग्लिश स्कूल व महाविद्यालयात ४२६ मुले व ३९७ मुली, एकूण ८२३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षक व कर्मचारी मिळून ३९ जण कार्यरत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता व सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे.
-प्राचार्य देवराम वडितके
-प्रवरेच्या खोऱ्यातील भुमीपुत्राची देणगी
पुण्यात वकिली व्यवसाय करणारे संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुकचे भुमीपुत्र अँड.अशोक बोरा यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी एक कोटी रुपयांची देणगी जाहीर केली. “अनावश्यक सत्काराचा खर्च टाळून तो निधी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी वापरावा,” असा संदेश त्यांनी दिला असुन कर्मवीरांच्या दूरदृष्टीचे आपण पाईप आहोत असे त्यांनी संदेशात सांगितले.
कर्मवीरांच्या जयंतीनिमित्त आश्वीतील हा सोहळा म्हणजे फक्त स्मरणाचा नव्हता;तर ज्ञानदीपाची अखंड ज्योत उजळवत ठेवण्याचा आणि गरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी नवा संकल्प करण्याचा प्रेरणादायी क्षण ठरला.
