नाशिक दिनकर गायकवाड येथील-तारवालानगर
अमृतधाम लिंकरोड हा मृत्यूचा सापळा बनला असून या मार्गाहून घराकडे जात असलेल्या एका ६१ वर्षीय सेवानिवृत शिक्षकाचा मोठ्या खड्ड्यात आदळून अपघात झाला होता.त्यात जखमी झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाची उपधारा दरम्यान प्राणज्योत मालवली.
याबाबत अधिक माहिती अशी की, येवला येथील वीरभद्र माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक दिनकर पांडुरंग झेटे (वय ६१) हे आपल्या कुटुंबा समवेत मखमलाबाद शिवारातील उदयनगर येथे वास्तव्यास होते. दिनकर झेटे हे रात्री आपल्या ॲक्टिव्हा गाडीवरून मखमलाबाद येथील घराकडे निघाले होते.
ते अमृतधाम तास्वालानगर लिंक रोडने प्रवास करत असताना रस्त्याच्या मधोमध असलेल्या एका मोठ्या खड्ड्याचा त्यांना अंदाज आला नाही.त्यामुळे खड्डयात त्यांची दुचाकी आदळली. क्षणातच गाडीवरील नियंत्रण सुटल्याने,ते गाडीवरुन डोक्यावर रस्त्यात कोसळले.
यात दिनकर झेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्राव सुरू झाला, यावेळी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राहुल जोरे, मेजर निलेश पवार, मिलिंद परदेशी आणि चेतन दवंगे या भागातून जात होते. त्यांनी हा अपघात पाहून लागलीच झेटे यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, काल उपचार सुरू असताना झेटे यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. काही सहकाऱ्यांनी झेटे यांना रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल केले. मात्र अतिरक्त स्राव झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
