मनपातील अधिकाऱ्याकडून महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी
जळगाव सिटीलाईन न्यूज नेटवर्क जळगाव महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याच्या गंभीर आरोपावरून निलंबित प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप याला अखेर शहर पोलिसांनी अटक केली आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
पीडित महिला डॉक्टरने दिलेल्या तक्रारीनुसार, घोलप वारंवार तिच्याशी अश्लील संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याने महिला डॉक्टरकडे शारीरिक संबंधांची मागणी करत छळ केला. या प्रकारामुळे त्रस्त होऊन पीडितेने प्रथम महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आणि त्यानंतर थेट शहर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल केला.
महिला डॉक्टरच्या केबिनमध्ये वारंवार येऊन घोलप अश्लील टिपण्या करत होता, असा गंभीर आरोप तिने तक्रारीत केला आहे. इतकेच नव्हे, तर एके दिवशी त्याने तिला स्वतःच्या केबिनमध्ये बोलावून थेट शरीरसुखाची मागणी केली, असे पीडितेने स्पष्टपणे नमूद केले आहे.
तक्रार दाखल केल्यानंतर, पीडितेवर प्रचंड मानसिक दबाव टाकण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेच्या घरी तसेच तिच्या पतीच्या कार्यालयात काही व्यक्तींना पाठवून धमकावण्यात आले. इतकेच नव्हे, तर तक्रार निवारण समितीचे सदस्य असल्याचे भासवून एका महिलेने पीडितेवर तक्रार मागे घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र चौकशीत त्या महिलेचा समितीशी काहीही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. या संपूर्ण प्रकरणातील गंभीरता लक्षात घेता, शहर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत डॉ. विजय घोलप याला अटक केली. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या धक्कादायक घटनेनंतर जळगाव महापालिकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे महापालिकेतील अंतर्गत शिस्त,महिला सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
