आश्वी संजय गायकवाड महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांमध्ये मोठे रस्ते जाळे,५,५२७ किमी रेल्वे मार्ग,विमानतळ,पाणीपुरवठा,वीज ग्रीड,दूरसंचार (इंटरनेट),तसेच शहरी भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांसारख्या भौतिक सुविधांचा समावेश आहे या आधुनिक पायाभूत प्रकल्पांच्या बांधकामात विशेष काळजी घेतली गेली,प्रवासासाठी खास आधुनिक पायाभूत सुविधा महामार्गावर निर्माणाधीन आहेत मात्र संगमनेर तालुक्यातील पानोडी ते राहाता हा महामार्ग निर्माण होत असताना दोन कि.मी.साठी येथील नागरिकांनी जीव धोक्यात घालायचा का?असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
राहाता–पानोडी (संगमनेर) हा ३६ किमी लांबीचा काँक्रीट महामार्ग तब्बल १५४ कोटींच्या खर्चातून उभारला जात आहे.महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ,मुंबई यांच्या मार्फत हे काम सुरू असून मोठ्या यंत्रसामग्रीसह गुणवत्तापूर्ण व जलद गतीने रस्ता उभा राहत आहे.लोहारे ते आश्वी बुद्रुक पाटबंधारे विश्रामगृहापर्यंत रुंदीकरण खोलीकरण करत एका दिशेने आधी काँक्रीट व त्यावर स्टिल टाकुन दुसरा थर टाकून पूर्ण झाला आहे.कामाचा वेग व गुणवत्ता पाहता हा रस्ता अत्यंत जलदगतीने उभा राहत असल्याचे कौतुक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मात्र याच वेळी आश्वी बुद्रुक येथील शासकीय विश्रामगृह ते आश्वी खुर्द प्रवरा उजवा कालवा या अवघ्या दोन किलोमीटरच्या रस्त्याने नागरिकांचं आयुष्य धोक्यात आणलं आहे.अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात या रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे की हा रस्ता आहे की खड्डा हेच समजेनासं झालेय.दररोज विद्यार्थी,शेतकरी, चाकरमाने आणि ज्येष्ठ नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.वाहतुकीचा प्रचंड ताण आणि खड्ड्यांमुळे अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे.
प्रवरा नदीवरील पूल तर अपघातांचं केंद्र ठरत आहे. डांबर पुर्णतःउखडलं असून मोठमोठे खड्डे झाले आहेत.खड्यांमध्ये पाणी साचले,दोन्ही बाजूंचे पाईप जाम झाले,पाण्याचा निचरा होत नाही.पुलावर दोन्ही साईडला माती साचली असुन त्यावर गवत उगवलं आहे तर पुलाच्या आश्वी खुर्द व आश्वी बुद्रुक दोन्ही कडुन कुठलेही दिशादर्शक फलकच नाहीत.संबधित प्रशासन ढिम्म आहे त्यामुळे पुलावरून प्रवास करणाऱ्यांना वेगाचा अंदाज न आल्याने सरळ गाडी नदीत जाऊन जीवित हानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही येथील प्रवास म्हणजे अक्षरशःजीवावर उदार होऊन प्रवास करणं झालं आहे.
आश्वी खुर्द गावात शिरताच रस्ता संपतो आणि फक्त खड्ड्यांचं साम्राज्य सुरू होतं.पावसाळ्यात या दोन्ही गावातून जाणं म्हणजे जिवंतपणे नरकयात्रा ठरते.हा रस्ता केवळ दोन गावांना जोडत नाही तर १५ ते २० गावातील नागरीक याच रस्त्याने दररोज ये जा करत असुन याच वर्दळीच्या रस्त्याने संगमनेर,लोणी,साकूर या प्रमुख मार्गांला जोडले जातात.या रस्त्यावर आठवडे बाजार,पेट्रोल पंप,शाळा,बँका,दवाखाने,मॉल, शोरूम्स असल्याने याठिकाणी नागरिकांची मोठी रहदारी आणि गर्दी असते.इतके महत्त्वाचं ठिकाण असूनही प्रशासनाचं लक्ष या टप्प्याकडे गेलेलं नाही की नुसता चालढकलपणा सुरू आहे.नागरिक आता संतप्त सवाल विचारत आहेत की दररोज मुलांना शाळेत सायकलने पाठवताना अपघात झालाच तर जबाबदार कोण? एवढा मोठा रस्ता होतोय पण आमच्या दोन किलोमीटरकडे कोणी लक्ष देत नाही.तर तरुणांचा प्रश्न अधिक धारदार आहे “येथे रोज अपघात होतात, शासन स्तरावर कोणीच दखल घेत नाही.मोठा अपघात झाल्यावर तरी सरकार उत्तर देणार का?”
येथील त्रस्त नागरिकांची ठाम मागणी आहे की या दोन किलोमीटरच्या टप्प्यावर तातडीने खड्डे बुजवून सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा. आम्ही महामार्गाचं कौतुक करतोय आहे पण नागरिकांच्या न्याय्य मागण्या दुर्लक्षित करणं अतिशय धोकादायक ठरेल. शासनाने आणि ठेकेदार व संबंधीत कंपनीने त्वरित जबाबदारी स्वीकारून या टप्प्याचं काम पूर्ण करावं, अन्यथा संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.
१५४ कोटींचा महामार्ग उभा राहत असताना दोन किलोमीटरसाठी नागरिकांनी जीव धोक्यात घालायचा का? हा प्रश्न प्रशासनाला सतावतो आहे. सरकार ठेकेदार आणि संबंधित विभाग कंपनी आता तरी जागे होणार का,हा खरा सवाल आहे.
