नाशिक दिनकर गायकवाड थार गाडीतून आलेल्या तिघांनी दोन भावांना गाठून त्यातील एका भावाला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याला दुखापत केल्याची घटना अंबड परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मोहन सुभाष शेळके (रा. श्रीकृष्णनगर, अंबड) हे शनिवारी (दि. २०) रात्री आठ वाजेच्या सुमारास अंबड एमआयडीसी रोड येथे त्यांचा चुलतभाऊ गौरव बाळू शेळके याच्यासह घरातील कुत्र्याला घेऊन फिरत होते.
त्यावेळी आरोपी पृथ्वीराज अंकुश सकाळे (वय २१), प्रेम पंजाबी, ओम्कार (पूर्ण नाव माहीत नाही) व त्यांचे इतर तीन साथीदार हे एमएच १५ -८०७७ या क्रमांकाच्या थार गाडीतून आले. त्यांनी फिर्यादी शेळके यांच्याजवळ जाऊन जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर गाडीतून लोखंडी रॉड काढून चुलतभाऊ गौरव याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारून त्याला गंभीर दुखापत केली.
यामध्ये गौरव शेळके याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यादरम्यान फिर्यादीसोबत असलेला कुत्रा भुंकू लागल्याने हे सर्व आरोपी गाडीत बसून पळून गेले.या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पलांडे करीत आहेत.
