नाशिक दिनकर गायकवाड शेअर मार्केट व आयपीओ मध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून दोघां आरोपींनी चार जणांना १ कोटी ११ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की आरोपी प्रिया देसाई व आनंद भाटिया यांनी दोन वेगवेगळे व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले होते.या ग्रुपमध्ये त्यांनी फिर्यादी व इतर तीन जणांना परस्पर सहभागी करून घेतले. या ग्रुपवर शेअर ट्रेडिंग व आयपीओ गुंतवणुकीबाबत माहिती देऊन यामध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा देण्याचे आमिष त्यांनी फिर्यादी व इतरांना दाखविले.
याकरिता त्यांनी एका लिंकद्वारे बनावट ट्रेडिंग ॲप गुंतवणूकदारांना डाऊनलोड करण्यास भाग पाडले.या ॲपद्वारे त्यांनी गुंतवणुकीच्या बहाण्याने विविध बँक खात्यांवर पैसे मागवून तिघांची एकूण ७६ लाख ५१ हजार ८५९ रुपयांची फसवणूक केली.पैसे भरूनही कोणताच परतावा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
परतावा फक्त ॲपवरच दिसत होता; मात्र प्रत्यक्षात पैसे मिळत नव्हते. हा सर्व प्रकार दि. २६ जून ते १६ सप्टेंबरदरम्यान घडला. या प्रकरणी देसाई व भाटिया यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे करीत आहेत.
फसवणुकीचा दुसरा प्रकार दि. २० जून ते १० सप्टेंबरदरम्यान घडला. वरील दोघा आरोपींनी फिर्यादी यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून त्यांनाही जादा परताव्याचे आमिष दाखवीत पैसे भरण्यास भाग पाडले.त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.
या ॲपच्या माध्यमातून त्यांनी चांगले परतावे मिळत असल्याचे फिर्यादी यांना सांगत गुंतवणूक करण्यास सांगितले. जादा आमिषाला बळी पडून फिर्यादीने विविध बँक खात्यांवर ३४ लाख ५९ हजार ७०८ रुपये भरले.
त्यांना तीन महिने उलटूनही कोणताच परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.त्यांनी त्वरित या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात दोघां सायबर भामट्यांविरुद्ध फिर्याद दिली. या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे करीत आहेत.
