नाशिक दिनकर गायकवाड नाशिक-सिन्नर महामार्गावरील शिंदे गावाजवळील टोलवेज कंपनीचा मोठ्या प्रमाणात गलथान कारभार सुरू असून, गेली अनेक दिवसांपासून महामार्ग नादुरुस्त झाला आहे.
नाशिक-सिन्नर रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला असून,यासंदर्भात विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांना विविध मागण्याचे निवेदन शिंदे-पळसे ग्रामस्थ व टोल हटाव कृती समिती याच्या वतीने सरपंच बाजीराव जाधव, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनील गायधनी, मा.सरपंच अजित गायधनी व जाखोरी उपसरपंच राहुल धात्रक यांनी दिले आहे.
संबंधित दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,की पंचक्रोशीतील नागरिकांनी वारंवार मुख्य रस्ता व सर्व्हिस रोड दुरुस्ती, पथदिवे,जागोजागी झालेले खड्डे व पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन,स्थानिक वाहनधारकाची होणारी पिळवणूक,महिलांबरोबर होणारी गैरवर्तणूक अशा विविध विषयावर विभागीय आयुक्तां बरोबर चर्चा करण्यात आली.
सदर समस्येवर संबधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य सकारात्मक मार्ग काढण्यात येईल,असे आश्वासन टोलनाका हटाव कृती समिती व लोकप्रतिनिधींना देण्यात आले,तर संबंधित मागण्यांचे निवेदन महसूल आयुक्त यांच्यासह जिल्हाधिकारी नाशिक, सार्वजनिक बांधकाम विभाग महामार्ग प्राधिकरण, पोलीस निरीक्षक नाशिकरोड यांना देखील देण्यात आले आहे. निवेदनात म्हटल्याप्रमाणे उपरोक्त मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही न केल्यास गुरुवार दि.१६ ऑक्टोबरपासून टोलमुक्त आंदोलन करण्याचा इशारा टोलनाका हटाव समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी सरपंच बाजीराव जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील गायधनी, मा.सरपंच अजित गायधनी, दिलीप गायधनी, रोहित जाधव,माधव गायधनी, हरिष जाधव, योगेश जाधव, नीलेश जाधव व नंदू नरवडे यांच्यासह शिंदे, पळसे,जाखोरी, चांदगिरी शेवगेदारणा,नाणेगाव, मोहगाव बाभळेश्वर आदी गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.
